नेरळमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाला दणका

नेरळ: अजय गायकवाड 

नेरळमधील भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे कवित्व संपत नाही तोच राष्ट्रवादीने भाजपाला मोठा दणका दिला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा झाला त्या मंगेश म्हसकर यांच्या प्रभागातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अनेक दिग्गजांच्या सततच्या पक्षप्रवेशामुळे नेरळमधील राजकारण सध्या तालुक्यात चर्चेत आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना नंतर परत राष्ट्रवादी असे पक्षांतर केलेल्या मंगेश म्हसकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य नरेश मसणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असून या पक्षप्रवेशाची चर्चा थांबण्याअगोदरच राष्ट्रवादीचे कर्जत तालुका उपाध्यक्ष भगवान चंचे आणि नेरळ शहराध्यक्ष निकेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली सत्तरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुरेशभाऊ लाड आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थिती मध्ये कर्जतच्या राष्ट्रवादी भवन येथे युवक राष्ट्रवादीची जिल्हा आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. आज प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते मंगेश म्हसकर यांच्या प्रभागातील असल्याने मंगेश म्हसकर यांना हा मोठा दणका मानला जात आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नेरळ मध्ये सुरु असलेल्या पक्षप्रवेशाला ग्रामपंचायत निवडणुकीचीही किनार आहे. त्यामुळे आगामी काळात नेरळमध्ये असे किती पक्षप्रवेश सोहळे होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत