नेरळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल

नेरळ: अजय गायकवाड 

भाजपा विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित करून पक्षसंघटना मजबूत करत आहेत. त्याच पर्शवभूमीवर नेरळमध्ये देखील आज भाजपचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

त्यामुळे नेरळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नेरळ येथील ऋषभ गार्डनच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात नेरळ ग्राम पंचायतीचे सदस्य मंगेश म्हसकर, कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे, संतोष शिंगाडे, प्रकाश पेमारे, नरेश पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेरळ आणि शेलू परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर मंगेश म्हसकर यांनी आपली भूमिका मांडली. नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे होऊ शकतात मात्र ती करण्याकरिता सक्षम पक्ष नेरळमध्ये असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात नेरळ ग्रामपंचायत राहिली किंवा नेरळ नगरपंचायत झाली तर नेरळवर भाजपाचीच सत्ता असेल असे मत मंगेश म्हसकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केले.   भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मोठ्याप्रमाणावर विविध पक्षातील कार्यकर्ते हे भाजपात सामील होत आहेत. आज नेरळमध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये भाजपात सामील झालेल्या कार्यकर्त्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत करत नेरळच्या विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी आमदार देवेंद्र साटम, कर्जत तालुक्याचे संपार्कप्रमुख विनोद साबळे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, दीपक बेहरे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, अशोक ओसवाल, शरद म्हात्रे,नितीन कांदळगावकर, शहराध्यक्ष अनिल जैन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत