नेरळ- कळंब जिल्हामार्ग खचला; रस्त्याच्या मध्यभागी पडले मोठे भगदाड

नेरळ – कांता हाबळे 

नेरळ – कळंब जिल्हा मार्गावरील बिरदोले गावाजवळ बुधवारी सकाळी 10 च्या सुमरास अचानक रस्ता खचला आहे. या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नसल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधानपणे वाहन चालवावे असे आवाहन स्थानिक व नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे. 
नेरळ – कळंब हा महत्वाचा जिल्हा मार्ग असून रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर बिरदोले गावाजवळ असणारी मोरी खचून पूर्ण रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमीन खचली असल्याचे बोलले जात आहे. हा रस्ता खचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नेरळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहून कोंडी कमी करण्याचा प्रयन्त करत असून अनेक प्रवाशांना सूचना देत आहेत.त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील हा खचलेला भाग लवकरात लवकर चांगला करावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सद्या या रस्त्यावरून दुचाकी जात असल्या तरी चारचाकी वाहने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ- कळंब हा रस्ता बंद झाला तर वाहन चालकांना मोठा हेलपाटा मारावा लागणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ खचलेला असता चांगला करावा अशी मागणी स्थानिक, वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.
मराठा मोर्चामुळे ठेकेदारांनीही काम बंद केले आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी माणसे मिळत नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी या रस्त्यावरील खचलेला भाग भरण्यात येईल. आणि रस्ता चांगला करण्यात येईल. 
–  आर. एम. वेलदोडे शाखाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग
नेरळ कळंब रस्ता बिरदोले गावाजवळ मध्यभागी खचला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे. हा रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडून वाहनचालकांना वाहने सावधान पणे चालवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. 
– मदन पाटील वाहतूक पोलीस, नेरळ
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत