नेरळ ग्रामपंचायतीकडून मच्छिमार्केटच्या गाळ्यांचे वाटप 

सात व्यावसायिकांना दिले गाळे ताब्यात

नेरळ : कांता हाबळे

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान टॅक्सी स्टँड समोर जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणाने सुमारे 7 लाख रुपये खर्च करून नेरळ मच्छी मार्केट ची उभारणी केली आहे. परंतु येथे अद्याप मच्छी व्यवसायीकांना स्थलांतरित करण्यात आले नव्हते. यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने गाळे वाटपासाठी अर्ज मागविले होते. आलेल्या 13 अर्जापैकी 7 अर्ज सर्व कागदपत्रे असल्याने पात्र ठरले आहेत.  त्यानुसार मंगळवारी नेरळ ग्रामपंचायतीने सभा बोलावली होती या सभेला मच्छी व्यवसायिक व सरपंचासह सदस्य हजर होते, त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत सात गाळे धारकांना गाळे वाटप करण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टॅक्सी स्टँड जवळ मच्छी मार्केटसाठी जवाहर रोजगार योजने अंतर्गत १९९३ साली 23  दुकांनांच्या गाळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या गाळ्यांचा वापर न झाल्याने नादुरुस्त झालेल्या या गाळ्यांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात सुमारे ७ लक्ष रुपये खर्चून केली. यासाठी नेरळ विकास प्राधिकरणाचा निधी वापरण्यात आला. या गाळ्यांचे २० डिसेंबर २०१६ रोजी उद्घाटन करण्यात आले होते. परन्तु तरीही मच्छी व्यवसायिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले नव्हते. या गाळ्यां संदर्भात कर्जत पंचायत समितीने देखील ग्रामपंचायतीला गाळे वाटप करण्याचे आदेश दिले होते.
नेरळ ग्रामपंचायतीने जानेवारी 2018 रोजी निविदा मागविली होती. त्यावेळी 13 अर्ज ग्रामपंचायतीत दाखल झाले होते. परंतु पूर्ण कागदपत्रानुसार 7 अर्ज पात्र ठरले आहेत, त्यानुसार मंगळवारी गाळे सात व्यवसायिकांच्या ताब्यात देण्यात आले. यात ए विंग मध्ये सुकी मच्छी व सी विंग मध्ये चिकन विक्रेत्यांना गाळे देण्यात आले आहेत. कादिर शेख, परवेज आढाव, लिलाकत रहेमान, हरीचंद्र भोईर, समीर टीवाले, मुंन्सी सय्यद, मुजमिल मानियार यांना गाळे वाटप करण्यात आले.
यावेळी नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक, सदस्य मंगेश म्हसकर, नितेश शहा, सदानंद शिंगवा, सदस्या संजीवनी हजारे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडगे, सुनील पारधी, हरीचंद्र भोईर, लिलाकात जाळगावकर, मिजमिळ मानियार आदी यावेळी उपस्थित होते.
नेरळ ग्रामपंचायतिने गाळ्यांसंदर्भात अर्ज मागविले होते, त्यानुसार 7 व्यवसायिकांना गाळे त्यांच्या त्याब्यात देण्यात आले आहेत. पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात येणार आहेत, मच्छी मार्केट एकच ठिकाणी असावे, असा आमचा उद्देश आहे. जे व्यवसायिक गाळ्यात स्थलांतरित होणार नाही, त्यांच्यावर ग्रामपंचायतच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. – मंगेश म्हसकर, सदस्य नेरळ ग्रामपंचायत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत