नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टरांची नियुक्ती

कडाव आणि आंबिवली येथील डॉक्टरांना जिल्हा आरोग्य विभागाने दिले आदेश

नेरळ : कांता हाबळे

नेरळ शहरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर असताना एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे येथे येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन जादा पैसे मोजावे लागत होते. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात अनेक वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा आरोग्य विभागाने या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात तीन तीन दिवस अशा दोन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर कधी मिळणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

कर्जत तालुक्यातील नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावातील व आदिवासी भागातील रुग्ण कमी खर्चात उपचार होतील या आशेने येत असतात. परंतु येथे आल्यावर येणाऱ्या रुग्णाची मोठ्या प्रमाणात निराशा होते. येथे कधी डॉक्टर नसतात तर कधी औषधांचा तुटवडा, तर कधी स्वच्छतेचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथे अनेक दिवसांपासून डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु डॉ. खालिद या अन्सारी यांनी 1 जुलै रोजी राजीनामा दिला आहे. व वैद्यकीय अधिकारी संकेत पवार हे 30 जुलै रोजी पासून गैरहजर असल्याने सद्यपरिस्थितीत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवा सुरळीत होण्यासाठी आणि पोस्टमार्टेम करण्यासाठी येथे एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता आहे.
परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कडाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा बांबेरे यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आणि आंबिवली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या पवार यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी व रविवारचे आदळून बदलून काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश होईपर्यंत उर्वरित दिवशी त्यांच्या नियुक्ती ठिकाणी काम करण्याचे पत्रात म्हंटले आहे. तसेच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय व आर्थिक कारभार तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे.यांच्याकडे देण्यात आला आहे.
एकूणच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असली तरी कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती या रुग्णालयात करावी. आणि रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात ही रुग्णांच्या नातेवाईकांकडून अपेक्षा.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत