नेरूळ-उरण रेल्वेमार्गावर प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे विशेष प्रयत्न सुरू; आज पुन्हा पाहणी

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरूळ-उरण रेल्वेमार्गावर प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नुकतीच नेरूळ ते खारकोपर या मार्गावर बारा डब्यांची रेल्वे चालवून या मार्गाची पाहणी करण्यात आली. त्या नंतर आज, मंगळवारी या मार्गावर रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली पुन्हा या मार्गावर रेल्वे चालवून मार्गाची पाहणी केली जाणार आहे. या पाहणी अहवालानंतर प्रवासी रेल्वेसेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढणार आहेत. मुख्यमंत्री किंवा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते या प्रवासीसेवेला शुभारंभ केला जाणार आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी होणार असून यावेळी रेल्वेचे आणि सिडकोचे अनेक अधिकारी उपस्थित असणार आहेत. या पाहणीमध्ये रेल्वेचे परीक्षण, सिग्नल यंत्रणा व्यवस्थित मिळत आहे की नाही, रेल्वेचे रूळ, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा, त्यांच्या सुविधा व्यवस्थित आहेत की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. ते याचा अहवाल तयार करतील आणि त्यानुसार उद्घाटनाची तारीख ठरवली जाणार आहे. सध्या तरी ४ नोव्हेंबरचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.

गुरुवारी, २५ ऑक्टोबर रोजी नेरुळ ते खारकोपर या मार्गावर बारा डब्यांची लोकल चालवून वेगाची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी रेल्वे आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेमधून नेरुळ ते खारकोपर परतीचा प्रवास केला होता. यावेळी रेल्वे स्थानकाच्या प्लास्टरला रेल्वेचा डबा घासला गेला होता. या अशा प्रकरच्या लहानसहान अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत. मंगळवारी अंतिम चाचणी केली जाणार आहे. यासाठी सकाळी साडेनऊ वाजता ही रेल्वे नेरूळ स्थानकातून सोडली जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत