पंढरपुरात बकऱ्याची कुर्बानी न देता केवळ नमाज पठण करुन ईद साजरी

पंढरपूर : रायगड माझा वृत्त 

जगभरात आज बकरी ईद अगदी उत्साहामध्ये साजरी होत असतानाचा पंढरपूरमधील आजची ईद मात्र विशेष कारणामुळे चर्चेत आहे. येथील मुस्लीम समाजातील बांधवांनी आज बकरी ईद आणि श्रावणी एकदाशी एकाच दिवशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देता केवळ नमाज पठण करुन ईद साजरी केली. श्रावणी एकदशी आणि बकरी ईद असे दोन्ही एकाच दिवशी आल्याने पंढरपूरमधील मुस्लीम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. या आगळ्या वेगळ्या ईद साजरा करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा पंढरपूरमधील हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे दर्शन झाले.

आज श्रावणी शुद्ध एकदशी असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी तीन लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. मंदिर परिसराबरोबर चंद्रभागा नदीच्या तिरावर आणि प्रदक्षिणा मार्गावर हजारोच्या संख्येने भाविक आहेत. तर दुसरीकडे आजच्याच दिवशी मुस्लिम समजासाठी महत्वाचा समजला जाणारा बकरी ईदचाही सण आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना बकरी ईददरम्यान देण्यात येणाऱ्या कुर्बानीचा त्रास होऊ नये म्हणून मक्का मशिदीचे इमामसाब हाफिज शेख, अध्यक्ष निसरभाई शेख आणि समस्त मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवायच बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला.

पंढरपूरमध्ये मागील अनेक दशकांपासून हिंदू- मुस्लीम समाज एकोप्याने नांदत आहे आणि आज मुस्लीम समजाने घेतलेले निर्णय हा त्याचीच पोचपावती आहे. याआधीही अशाप्रकारे एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली होती त्यावेळीही मुस्लीम समाजाने कुर्बानी रद्द करत नमाज पठण करुन ईद साजरी केली होती अशी आठवण निसरभाई शेख यांनी करुन दिल्याचे एबीपी माझाने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. आज रद्द करण्यात आलेली कुर्बानी उद्या देण्यात येईल अशीही माहिती मुस्लीम बांधवांनी दिली.

कुर्बानी रद्द करण्याबरोबरच मुस्लीम समजाने केरळमधील पुरग्रस्तांसाठी आपल्या आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करावी असे आवाहनही शेख यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत