पंढरपुरात महापूजा; सीएमची ‘वर्षा’वर विठ्ठलपूजा

पंढरपूर/मुंबई: रायगड माझा 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर, हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्यानं शासकीय महापूजा केली. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं. तसंच दुसरीकडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत वर्षा या सरकारी निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी इशारा दिल्यानंतर फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अनुपस्थितीत हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेचा मान मिळाला. विठ्ठल मंदिरात मध्यरात्री दोनच्या सुमारास शासकीय महापूजेला सुरुवात झाली. जाधव दाम्पत्यानं पूजा केली. महाराष्ट्रात विविध आंदोलनांमुळं अशांतता पसरली आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलालं घातलं. दरम्यान, फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, असं साकडं फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत