पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत धाकटा खांदा लगतच्या प्रकल्पात स्थानिकांना डावलण्याचे शापुरजी पालनजी कंपनीचे कट कारस्थान

पनवेल : साहिल रेळेकर (प्रतिनिधी)

खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरात धाकटा खांदा गावालगत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत होत असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना आश्वासन देऊनही काम देत नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा पनवेल महापालिका माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरससेविका हेमलता म्हात्रे, बाळकृष्ण हशा म्हात्रे, राकेश म्हात्रे, प्रविण पाटील, भास्कर भगत, रवींद्र डोंगरे, काना पाटील, गणपत म्हात्रे, किशोर म्हात्रे, भगवान म्हात्रे, गणेश म्हात्रे, शैलेश म्हात्रे, भरत म्हात्रे, नितेश म्हात्रे, सुजीत म्हात्रे, परशुराम डोंगरे, गुरुनाथ पाटील, गणपत पाटील, हरीभाऊ भगत, विलास पाटील, राजू म्हात्रे, गिरीश म्हात्रे, दीपक म्हात्रे, मयूर म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे, सतीश पाटील, विनोद भगत, बाळाराम म्हात्रे, वासुदेव म्हात्रे,उत्तम गायकर,मनोहर शंकर म्हात्रे,प्रवीण म्हात्रे, रुपेश पाटील, विकी तांबडे, विशाल तांबडे, प्रकाश म्हात्रे, संजय भगत, प्रकाश चिंतू म्हात्रे यांच्यासह सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

धाकटा खांदा गावाच्या हद्दीत सिडकोमार्फत होत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचे मुख्य कंत्राट शापुरजी पालनजी या कंपनीला दिले आहे. संपूर्ण परिसरात कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रकल्पाचे काम ज्या जमिनीवर होत आहे त्या सर्व जमिनी सिडकोने अत्यंत अल्प दरात स्थानिकांकडून संपादित केल्या आहेत. त्या मोबदल्यात सिडकोने स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सिडकोने स्थानिकांच्या संपादित केलेल्या जमिनीवर प्रकल्प येत असताना त्याठिकाणी परिसरातील प्रकल्पग्रस्त स्थानिकांना किमान रोजगार मिळावा यासाठी कंपनीने त्या प्रकल्पाच्या कामात स्थानिकांना विविध पद्धतीने सामावून घ्यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२० मध्ये खांदा गावातील स्थानिकांनी या प्रकल्पात काम मिळण्यासाठी शापुरजी पालनजी कंपनी प्रशासनाकडे बैठक घेतली व त्यादरम्यान बाजार भावाच्या तुलनेत कमी दरात दरपत्रक देखील सादर केले होते. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या चर्चेला अजून पूर्णविराम मिळत नसेल तसेच चर्चा सुरू असताना काम सुरू ठेवत स्थानिकांना डावलून मुंबईतील निकटच्या कंत्राटदाराला कामाची ऑर्डर देण्याचे कट कारस्थान शापुरजी पालनजी कंपनी प्रशासन करत असेल तर ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनादरम्यान घेतला.

शापुरजी पालनजी कंपनीने निश्चितपणे आपले काम करावे आमची काहीही हरकत नाही परंतु त्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना समाविष्ट करून स्थानिकांच्या योग्यतेची विविध कामे मिळावी अशी मागणी करत स्थानिक प्रकल्पग्रस्त जर आपल्या हक्काचे काम मागत असतील तर त्यात गैर काय आहे.? असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी यादरम्यान केला.

तसेच शापुरजी पालनजी कंपनी पोलिस बंदोबस्ताच्या मदतीने स्थानिकांचा आवाज दबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. त्याचप्रमाणे कंपनीकडून जर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नसतील तसेच स्थानिकांच्या पदरात न्याय पडणार नसेल तर याठिकाणी कंत्राटदाराला काम करू देणार नाही; मग आमच्यावर कायदेशीर कारवाई झाली तरी बेहत्तर.! असा कडक इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनादरम्यान दिला.

शापुरजी पालनजी या कंपनीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खांदेश्वर रेल्वे स्थानकालगत धाकटा खांदा गावाच्या हद्दीत ३६ इमारतींचे कंत्राट शासनाने दिले आहे.

मानसरोवर रेल्वे स्थानकालगत जुई आणि कामोठे हद्दीत देखील या कंपनीला सदरचे कंत्राट देण्यात आले आहे.

शापुरजी पालनजी कंपनीचे अभियंते व विभाग प्रमुखांनी धाकटा खांदा गावातील लोकांना फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत स्थानिक प्रकल्पग्रस्त म्हणून विविध कामे देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान त्या बैठकीत कामाचे स्वरूप व बाजार भावाच्या तुलनेत कमी दरात तडजोड करून काम करण्याचे स्थानिकांनी दरपत्रक देखील कंपनीसमोर सादर केले होते.

परंतु असे असतानाही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून एस बी ट्रान्सपोर्ट म्हणजेच शब्बीर कुरेशी या कंत्राटदाराला शापुरजी पालनजी कंपनीने परस्पर काम देऊन स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी केला आहे.

यापूर्वी स्थानिक आणि कंपनी प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हे स्पष्टपणे ठरले होते, की ज्यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी धाकटा खांदा गावालगत असलेल्या या प्रोजेक्टसाठी काम करण्यास येतील तेंव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच तसेच स्थानिक ग्रामस्थांना या प्रकल्पात काम देऊनच पुढील कामाला सुरुवात करतील. परंतु असे असतानाही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून कंपनीने शब्बीर कुरेशी यांना परस्पर काम दिले तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त त्याठिकाणी न्याय मागण्यासाठी जाऊ नयेत यासाठी शब्बीर कुरेशी या कंत्राटदाराने दिवाळीपूर्वी स्थानिकांचे आंदोलन हाणून पाडता यावे यासाठी पोलिसांना हाताशी धरत प्रकल्पाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून स्थानिक प्रकल्पगग्रस्तांवर अन्याय केल्याचा आरोप मनोहर म्हात्रे यांनी आंदोलना दरम्यान केला.

त्यावेळी आंदोलना दरम्यान शापुरजी पालनजी चे अधिकारी आले असता त्यांच्याकडून सांगण्यात आले, की शब्बीर कुरेशी या कंत्राटदाराला अद्याप वर्क ऑर्डर दिली नसून स्थानिकांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही. त्यामुळे कंपनी प्रशासनाकडून दिलेल्या या आश्वासनामुळे स्थानिकांनी त्यावेळेचे आंदोलन स्थगित केले होते. परंतु असे असतानाही शब्बीर कुरेशी या कंत्राटदाराने स्थानिकांना डावलून बिनदिक्कतपणे त्याठिकाणी काम सुरूच ठेवले.

त्यानंतर एस. बी. कंपनीच्या प्रतिनिधीने गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आमिषे देण्याचा प्रयत्न केला पण त्या आमिषाला स्थानिक भुलले नाहीत. याच दरम्यान एस. बी. कंपनीने गावात भांडणे लावण्याच्या उद्देशाने परस्पर गावातील एकाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले पण ग्रामस्थांनी याविषयी त्या व्यक्तीशी चर्चा झाल्यावर मात्र एस. बी. कंपनीला ग्रामस्थांनी एकत्र येऊन धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार मूळ ठेकेदार शापूरजी पालनजी यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पोलिसांचा दबाव वापरून ग्रामस्थांचा विरोध मोडून टाकण्याचा प्रयत्न कंपनी कडून केला गेला. तरीही न डगमगता नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी सदर बाब आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कानावर घातली आणि त्यानुसार पुन्हा सर्व ग्रामस्थांची प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी मोर्चा नेला.

१९६० सालापासून सिडकोने स्थानिकांच्या जमिनी कवडीमोलात संपादित केल्या असून त्यामोबदल्यात अद्यापही आश्वासने पूर्ण केली नसून किमान स्थानिकांच्या जमिनीवर सुरू असलेल्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी समाविष्ट करून घेतले जात नसेल तर स्थानिकांनी आत्महत्या करावी का.? असा सवाल यावेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी केला.

अखेर परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर, ग्रामस्थ आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सध्या तरी अर्धे काम देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून उरलेले एस. बी. कंपनीचे काम देखील ग्रामस्थ हेच करतील असे देखील सांगण्यात आले. पण यावर ठोस निर्णय दोन दिवसात होणार असून तो निर्णय जर सकारात्मक न होता ठेकेदाराच्या बाजूने झाला तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. तसेच ठेकेदार पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर खोट्या तक्रारी करू लागला आहे. एकीकडे आमिषे द्यायची, एकीकडे चर्चा सुरु ठेवायच्या आणि परस्पर कामे मात्र बाहेरील कंत्राटदाराला द्यायची अशा पद्धतीचे कट कारस्थान आम्ही खपवून घेणार नाही. जोपर्यंत ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील असा कडक ईशाराही नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी यादरम्यान दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत