पंतप्रधान मोदी आज शिर्डीत

मुंबई :रायगड माझा वृत्त 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी १९ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सव समारोपच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. शिर्डीच्या साई संस्‍थानच्‍या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्‍पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते होईल, अशी माहिती त्या संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकारांना दिली आहे.

लक्षावधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतल श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८रोजी १०० वर्ष पूर्ण झाले. साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने समाधीचा शताब्‍दी सोहळा ०१ ऑक्‍टोंबर २०१७ ते १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात आला. तसेच १७ ते १९ ऑक्‍टोबर याकाळात श्री पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. उद्या शुक्रवारी १९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज्‍य शेती महामंडळाच्‍या मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते संस्‍थानच्‍या विविध प्रकल्‍पांचे भूमिपूजन, श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाच्‍या चांदीच्‍या नाण्‍याचे लोकार्पण आणि प्रधान मंत्री आवास योजनेचा शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान राज्‍यपाल सी. विद्यासागर राव भूषविणार असून, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भांबरे, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे, जिल्‍ह्यातील खासदार, आमदार आदी उपस्थित राहणार आहेत असे हावरे यांनी सांगितले.

श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोप निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते श्री साई दर्शनरांग इमारत, शैक्षणिक संकुल इमारत, साई नॉलेज पार्कच्या इमारत बांधकामाचे तसेच १० मेगावॅट क्षमतेच्या सोलर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. साईभक्तांसाठी नवीन आकर्षक केंद्र निर्माण करण्याचा भाग म्हणून साईबाबांचे जीवनकार्य, त्यांच्या शिकवणीची माहिती देण्यासाठी साई गार्डन, थीमपार्क, लेजर शो प्रकल्प, श्री साईसच्चरित ग्रंथातील प्रसंगावर आधारीत चलचित्र स्वरूपातील देखावे, लाइट व साऊंड इफेक्ट यासाठी साई नॉलेज पार्क उभारण्यात येत असून, त्या प्रकल्पासाठी १६६.३९ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे, असे डॉ. हावरे यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत