पक्षाने माझा फक्त वापर करून घेतला- एकनाथ खडसे

जळगाव : रायगड माझा वृत्त 

धुळे मनपाच्या निवडणुकीत भाजपने काही गुंडांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने वाल्याचा वाल्मिकी करावा, पण हे करताना पक्षच वाल्या बनू नये याचीही काळजी घ्यावी, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज पुन्हा बरसले. गरज पडेल तसा पक्षाने आपला वापर करून घेतला, अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली.

बहिणाबाई महोत्सवाच्या तयारीनिमित्ताने एकनाथ खडसे हे भुसावळ येथे आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली. ‘सामना’च्या अग्रलेखात एकनाथ खडसे यांना भाजपने बाजूला सारल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात विचारले असता खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेले मत शंभर टक्के खरे असल्याचे सांगून त्यांच्याशी सहमत असल्याचे स्पष्ट केले. गेली 40 वर्षे मी पक्षाची सेवा केली आहे. गरज होती तेव्हा पक्षाने माझा वापर करून घेतला, असे ते म्हणाले.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने काही गुंडांना उमेदवारी दिली आहे. भाजपने वाल्याचा वाल्मिकी करावा, पण हे करत असताना भाजपने स्वतःच वाल्या बनू नये याचीही काळजी घ्यावी, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला. सत्तेसाठी आपण कधीही लाचार नव्हतो आणि होणार नाही, असेही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत