पक्ष माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही: पंकजा मुंडे

Image result for पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर"

 

परळी: महाराष्ट्र News 24 वृत्त

पक्ष माझ्या बापाचा मी पक्ष सोडणार नाही, हवं तर पक्षाने मला सोडावं असं थेट आव्हान भाजप नेतृत्वाला देत आपल्या राज्य दौऱ्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांना पक्षात मोठं केले. पण त्यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या रक्तात बेईमानी नसल्याचे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी उपस्थित होते. या मेळाव्याला मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टनंतर पंकजा मुंडे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर अनेक चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या आजच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

मन मोकळं केलं नाही तर विष तयार होतं असं म्हणतं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी यावेळी केली. २७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विकासाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत