पतीसह सासु-सासऱ्याला दंडासह सक्तमजूरी!

नवविवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

आपल्या नवविवाहित सुनेला लग्नानंतर काही दिवसातच माहेरहून पैसे आणणेस तगादा लावत पैसे आणत नसल्याने शारिरीक व मानसिक छळ केल्याने कंटाळुन अखेर सुनेने रोहा येथील अंबा नदीच्या पात्रात उडी मारुन जीवन संपवल्याप्रकरणी माणगांव सत्र न्यायालयाने पती, सासू व सासऱे यांना दोषी ठरवत दंडासह सक्तमजूरीची सजा सुनावली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागोठणे ता. रोहा, जि. रायगड गावचे हद्दीतील भागाड येथे ०३ जून २०१२ रोजी घडली होती. यातील आरोपी साकीब इस्माईल खान हा मयत अल्मास हिचा पती असून आरोपी  इस्माईल हुसेन खान हा सासरा व सलमा इस्माईल खान ही सासू असून शाहिस्ता इस्तीयान खान मयत हिची नणंद आहे. मयत अल्मास हिचे लग्न साकीब इस्माईल खान याचे बरोबर मुस्लिम समाजाचे रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपताच काही दिवसातच मयत हिस आरोपी यांनी आपले रंगत दाखवित वेळोवेळी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला व नवविवाहित मयत तरुणी माहेरून पैसे आणत नसल्याने आरोपींनी हे संगनमत करीत तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत असत. या नेहमीच्या आरोपींच्या छळास कंटाळून नवविवाहित तरुणीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत अंबा नदीचे पात्रात उडी मारून आपले जीवन संपवले. सदर घटनेची फिर्याद मयत अल्मास हिचे वडिल सर्फराज इसहाक डबीर यांनी दाखल केली होती. त्यानुसार नागोठणे पोलिस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३०४-ब,३०६, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास डि. ए. सोनवणे, पोलिस निरीक्षक नागोठणे पोलिस ठाणे यांनी केला व आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याची सुनावणी सत्र न्यायालय, माणगांव-रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील श्री. जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय सादर केले. सत्रन्यायाधीश मा. टी. एम. जहागिरदार, माणगांव यांनी आरोपी पती साकीब इस्माईल खान, सासरा इस्माईल हुसेन खान, व सासू सलमा इस्माईल खान यांना भा.द.वी. कलम ४९८ अ आणि ३०६ या कलमांतर्गत दोषी ठरवले तर शाहिस्ता इस्तीयान खान हिची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. यातील आरोपींना सश्रम कारावास व प्रत्येकी रु. २०,०००/- दंड व दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास, भा.द.वि.क. ३०६ अन्वये प्रत्येकी २ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी रू. २५,०००/- दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत