पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेने रोखले विद्यार्थ्यांचे रिझल्ट; पालकांचा आत्मदहनाचा इशारा

पनवेल : साहिल रेळेकर 

हल्ली अनेक शाळा आता आपल्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या प्रशासकीय वादामुळे चर्चेत असतात. अवाजवी शुल्क आकारणे आणि विद्यार्थ्यांसह पालकांची पिळवणूक करण्याचे प्रकार आता सर्रास समोर येऊ लागले आहेत. खांदा कॉलनी पनवेल येथील सेंट जोसेफ या शाळेसंदर्भात अशाच तक्रारी समोर येत असून शाळा व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पालकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार करून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

 

पनवेलमधील सेंट जोसेफ शाळा

नवीन पनवेल सेक्टर सात मधील सेंट जोसेफ हायस्कूल ही शाळा गेल्या तीन वर्षापासून वारंवार वादाच्या भोवऱ्यात आहे. मुलांना आणि पालकांना हरतऱ्हेने आर्थिक, मानसिक,आणि शारीरिक त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सामाजिक प्रतिष्ठासुद्धा मलिन करून वेगवेगळ्या पालकांविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करून त्रास देत असल्याची पालकांची तक्रार आहे. फी भरली नाही या कारणाने शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे गुणपत्रक रोकुन ठेवले आहे. जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत गुणपत्रक देणार नाही असा निर्णय सेंट जोसेफ शाळा प्रशासनाने घेतल्याने पालकवर्ग आक्रमक झाला आहे.

आमच्या पाल्याचे गुणपत्रकाच आम्हाला मिळाले नाही तर आमच्या पाल्याची प्रगती कशी आहे हे आम्हाला कसे समजणार. दरवर्षी भरमसाठ फी वाढवली जाते आणि याफी वाढीवर कोणाचाच अंकुश नसल्याने शाळा प्रशासन पालकांना वेठीस धरत आहे. विद्यर्थ्यांना खालच्या तुकडीत टाकणे, ओळखपत्र न देणे, त्यांना टेरेसवर शिकवणे अशा प्रकारचा भयानक प्रकार शाळा प्रशासन विद्यार्थ्यांवर करत असल्याचे समोर आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जागे करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिलाय.

शाळा प्रशासनाने अधिकृतपणे शाळेची फी जाहीर करावी त्यानुसार आम्ही फी भरायला तयार आहे. मात्र शाळा प्रशासन फीची रक्कम अधिकृतपणे जाहीर करायला तयार होत नसल्याचे पालकांनी सांगितले आहे. यावर पनवेल तालुका शिक्षण अधिकारी साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी शाळेच्या फी संदर्भात शाळा प्रशासनाला आणि पालकांना वेळोवेळी सूचित केले आहे, आणि त्यावर शाळा प्रशासनाने फी आकारली पाहिजे असे निर्देश जिल्हा शिक्षण अधिकारी आणि प्राथमिकचे उपसंचालक यांच्याकडून दिले असल्याचे सांगितले.

यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्याचा आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी प्रयत्न केला मात्र मुख्याध्यापकांनी भेटण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळा व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे अनेक मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे त्वरित रायगड जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रक काढून शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा प्रशासनाने याचे पालन न होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शाळेची असेल असे नमूद केले आहे.

शासन मुजोर शिक्षण संस्थांना वेसण घालण्यासाठी अनेक कायदे करते मात्र अशा अनेक संस्था शासनाला जुमानत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. शाळेचा या मनमानी कारभाराला शिक्षण विभाग कधी आवर घालणार हा मुख्य प्रश्न समोर आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत