पनवेलमध्ये गुटख्याचा साठा जप्त; पनवेल पोलिसांची कारवाई

पनवेल : साहिल रेळेकर (प्रतिनिधी)

पनवेल शहर पोलिसांनी करंजाडे येथे छापा टाकला असता एका इको कारमध्ये मानवी शरीराला अपायकारक असणारा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा म्हणजेच गुटख्याच्या साठा असल्याचे निष्पन्न झाले असून सदरचा साठा पनवेल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा प्रतिबंधित माल हा आरोपी विरेंद्र बुद्धसेन गुप्ता याचा असल्याने गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता घरामध्ये सुद्धा सदरच्या प्रतिबंधित मालाचा साठा व ग्राहकांना गुटखा खरेदी करण्यासाठी आमिष दाखविण्यासाठी आणलेले 8 एलईडी टीव्ही देखील जप्त करण्यात आले आहेत.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी गुटखा सेवनाचे भयंकर दुष्परिणाम विचारात घेता, अशा घातक गोष्टीपासून समाजाला वाचविण्यासाठी सामाजिक उदात्त हेतूने सर्वांनी गुटखा विक्रीबात “झिरो टॉलरन्स” संकल्पना राबविणे आवश्यक असल्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीच्या आधारे माहिती प्राप्त करून करंजाडे येथे छापा टाकून एका विरेंद्र गुप्ता या आरोपीला अटक केली आहे.

या गुन्ह्यात पनवेल शहर पोलिसांनी 1,83,636 रुपये किंमतीची गुटख्याची पाकिटे, 50230 रुपये रोख रक्कम, 1,47,000 रुपये किंमतीचे 8 सॅमसंग एलईडी टीव्ही आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली 4 लाख रुपये कींमतीची इको कार असा एकूण 7,80,866 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरच्या गुन्ह्यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी तात्काळ अटक करून गुटखा विक्रीबाबत केलेल्या कारवाईमुळे गुटखा माफियांना आता चांगलाच हादरा बसला आहे. त्यामुळे पनवेल शहर/तालुक्याच्या हद्दीत गुटखा विक्री होताना यापुढे आढळून आल्यास गुटखा माफियांची पोलिसांकडून अजिबात गय केली जाणार नाही असा विश्वास पनवेलच्या जनतेमधून व्यक्त केला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत