पनवेल : भाजप नगरसेवकाचा महिलेवर हल्ला

पनवेल : रायगड माझा वृत्त

हॉटेलच्या आवारात लघुशंका करू नका, असे सांगितल्यामुळे अहंकार दुखावलेल्या पनवेल महापालिकेतील भाजपचा नगरसेवक संजय भोपी याने हॉटेलचालक महिला, तिचे पती आणि मुलगा यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण परिसरात घडला. मारहाण केल्यानंतर दुसऱया दिवशीही भोपी आणि त्याच्या गुंडांनी पेणमध्ये येऊन या हॉटेलचालक दाम्पत्याला धमकावल्यामुळे ते कमालीचे तणावाखाली आले आहेत. राजकीय दबावापोटी याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

गीता पाटील आणि त्यांचे पती मंगेश पाटील हे दाम्पत्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण परिसरात छोटेसे हॉटेल चालवतात. गेल्या काही दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास पनवेल महापालिकेतील भाजपचा नगरसेवक संजय भोपी आणि त्याच्या कार्यकर्त्यांची खासगी बस तिथे आली. सर्वांना स्वच्छतेचे धडे देणारे हे भाजपचे कार्यकर्ते आणि भोपी यांनी पाटील यांच्या हॉटेलच्या आवारात लघुशंका करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाटील दाम्पत्यांनी येथे लघुशंका करू नका बाजूला जा, असे भोपी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे भोपीचा अहंकार दुखावल्याने त्याने पाटील दाम्पत्यांसह त्यांच्या मुलालाही बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये जोरदार धिंगाणा घातला. त्यानंतर भोपी आणि त्यांच्या गुंडांनी दुसऱया दिवशी पेणमध्ये येऊन पाटील कुटुंबीयांना मारहाण केली आणि त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. बांधकामाची बिले देण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकडही या गुंडांनी लुटली असल्याचा आरोप पाटील दाम्पत्याने केला आहे.

तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
हा प्रकार घडल्यानंतर गीता पाटील आणि मंगेश पाटील यांनी थेट पेण पोलीस ठाणे गाठले. मात्र राजकीय दबावापोटी तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी थेट अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात या घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. त्यांचा हा तक्रार अर्ज स्थानिक पोलिसांकडे आला असून याप्रकरणी चौकशी सुरू झाली असल्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत