परिवहनमंत्री दिवाकर रावते दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर

संभाजीनगर : रायगड माझा वृत्त 

परिवहनमंत्री दिवाकर रावते संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. शनिवारपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात ते प्रत्येक तालुक्यातील गावांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावाही घेणार आहेत.

मराठवाड्यातील पैसेवारी महसूल विभागाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये २० गावे वगळता संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. परिस्थिती पाहता पुढील काही दिवसात या २० गावांची पैसेवारीही कमी होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते उद्या शनिवारपासून जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

शनिवारी सकाळी ९.५५ वाजता पैठण तालुक्यातील आडूळ येथे पिकांची पाहणी करून ते अब्दुलपूर तांडा, पारुंडी तांडा येथे भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता ते अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतील. तेथून दुपारी ते गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे जाणार आहेत. २.५० वाजता पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. ३.५० वाजता गुरुधानोरा, ४.५० वाजता दहेगाव बंगला येथे पाहणी करुन ते गंगापूर येथे येणार असून, अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

रविवारी सकाळी ९.३० वाजता रत्नपूर तालुक्यातील भडजी येथे पिकांची पाहणी करणार आहेत. १०.५५ वाजता ममनापूर, ११.४५ वाजता गदाणा येथे पाहणी केल्यानंतर १२.५५ वाजता रत्नपूर येथे आढावा बैठक, दुपारी २ .२५ वाजता कन्नड तालुक्यातील देभेगाव, ३.१५ वाजता देवळाणा, ४.३० वाजता टापरगाव येथे पाहणी केल्यानंतर ५.४५ वाजता ते कन्नड येथे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता ते वैजापूर तालुक्यातील हडसिंपपळगाव येथे ११ वाजता शिवराई, ११.५५ वाजता तिढी येथे पीक पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता वैजापूर येथे आढावा बैठक घेतली जाणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत