पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकी

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकी

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचे फोन आले आहेत. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे फोन आल्याचा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी राजे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे फोन आले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तरीही फोन करणाऱ्या व्यक्तीने अर्वाच्च भाषा वापरत थेट राज्यातील मंत्री रामदास कदम यांना धमकावले आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. मराठा आरक्षणाचे श्रेय खासदार नारायण राणे यांचे असल्याचे सांगत त्यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. पण यावरून रामदास कदम यांनी छत्रपती संभाजी राजेंवर टीका केली. छत्रपती संभाजी राजेंबद्दल आम्हाला सन्मान आहे. पण त्यांनी कोणाची लाचारी पत्करू नये, असे रामदास कदम यांनी म्हटले होते. यावरूनच छत्रपती संभाजी राजे यांचे कार्यकर्ते चिडले असल्याचे समजते. त्यांनी रामदास कदम यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना धमकावले. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने अर्वाच्च भाषेत रामदास कदम यांच्याशी बोलत त्यांना धमकी दिली, अशी माहिती रामदास कदम यांच्याकडून मिळाली. या संभाषणाची ऑडिओ क्लीपही काही जणांकडे आहे.
रामदास कदम आता या प्रकरणी काय करणारे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजे यांची याबाबतची भूमिका समजलेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत