पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ४१ धावांनी पराभव

रायगड माझा वृत्त

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाला ४१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. इंग्लंडच्या महिला संघाने दिलेल्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत इंग्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. प्रभारी कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना डॅनिएल वेट (३५), कर्णधार हीदर नाइट (४०) आणि टॅमी ब्युमाँट (६२) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकांत सहा बाद १६० धावा केल्या. डॅनिएल वेट (३५) आणि टॅमी ब्युमाँट (६२) यांनी इंग्लंडला दमदार सुरूवात करून दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी केली. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर दीप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हरमनप्रीत कौरने दुखापतीमुळे या मालिकेतूनदेखील माघार घेतली असल्याने स्मृती मानधनाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १६१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेलल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. स्मृती मानधना(२), मिताली राज(७), जेमिमा रॉड्रिग्ज(२) आणि हर्लिन देओल (८)यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारताकडून सर्वाधिक धावा शिखा पांडेने(२३) काढल्या. दीप्ती शर्मा (२२)ने तिला चांगली साथ दिली. मात्र, भारताला विजय मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. इंग्लंडकडून लिन्से स्मिथ आणि कॅथरिन ब्रंट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

सात मार्च रोजी भारत आणि इंग्लंड महिला संघात दुसरा टी-२० सामना होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान जिंवत ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत