पहिल्या पावसात भिजताना चिमुरडीचा शॉक लागून मृत्यू

Image result for electric shock death clipart

रायगड माझा वृत्त  । मुंबई

पहिल्या पावसाचा आनंद लुटत इमारतीच्या गार्डनमध्ये खेळत असताना एका मुलीचा वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मीरारोड येथे घडली आहे. या मुलीला वाचविण्यासाठी गेलेले तिचे मित्र मैत्रिण देखील जखमी झाले असून एका मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रुती यादव (११) असे त्या मृत मुलीचे नाव असून तिचा भाऊ प्रिन्स यादव (७) हा किरकोळ जखमी झाला आहे. सोसायटीची देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप श्रुतीचे वडील रामभारत यादव यांनी केला आहे.

श्रुती ही तिच्या कुटुंबियांसोबत मीरा रोडमधील सॅंडस्टोन सोसायटीत राहात होती. सोमवारी संध्याकाळी पडलेल्या पहिल्या पावसात भिजण्यासाठी श्रुती व सोसायटीतील इतर मुले इमारतीच्या आवारात असलेल्या गार्डनमध्ये जमली होती. पावसात खेळत असतानाच तेथील झाडावरून खाली लटकणाऱ्या वीजेच्या तारेला श्रुतीने स्पर्श केला व तिला जबर वीजेचा धक्का बसला. श्रुतीला विजेच्या तारेला चिकटलेली पाहून तिचे मित्र मैत्रिण तिला वाचवायला गेले मात्र त्यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यानंतर मुलांच्या पालकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले मात्र तेथे पोहोचण्याआधीच श्रुतीचा मृत्यू झाला होता. तर श्रद्धा (१२) हीला रुग्णालयात दाखल करण्याात आले असून इतर मुलांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

दरम्यान श्रुतीचे वडील रामभारत यादव यांनी सोसायटीतील समिती सदस्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप केला आहे. ‘चार वर्षापूर्वी सोसायटीने वीजेच्या तारा झाडावर अडकवल्या होत्या या तारा वेगवेगळ्या ठिकाणी चिकटपट्टीने चिटकवलेल्या . दोन महिन्यांपूर्वी गार्डनमध्ये खेळत असताना काही मुलांना वीजेचा धक्का लागला होता. त्यावेळी मी स्वत: काही पालकांसोबत सोसायटीच्या समितीकडे गेलो होतो व त्यांना या तारा तेथून काढुन टाकण्यासाठी सांगितले होते. मात्र सोसायटीने फक्त मुख्य प्रवेशद्वाराजवळीत तारा काढल्या व इतर तारांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळेच आज ही घटना घडली आहे,’ असे रामभारत यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सोसायटीचा अध्यक्ष, सचिव व खजिनदाराला अटक केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत