पाकिस्तानची घुसखोरी सुरूच; भारताने पाकचे एफ-१६ विमान पाडले

श्रीनगर : रायगड माझा वृत्त

पाकिस्तानचा आणखी एक डरपोक डाव भारताने उधळून लावत धडा शिकवला आहे. पाकिस्तानची तीन विमाने आज, बुधवारी (दि.२७) जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसली. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची विमाने पिटाळून लावली. तसेच नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तान हवाई दलाचे एफ-१६ हे विमान पाडण्यात भारतीय हवाई दलाला यश आले आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सीमारेषेचे उल्लंघन करत पाकिस्तानने आज, बुधवारी भारतीय हद्दीत ३ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली. मात्र, नौशेरा सेक्टरमधील लाम खोऱ्यात घुसलेले पाकिस्तानचे विमान पाडण्यात आल्याचे समजते. दरम्यान, विमाने पिटाळून लावल्यानंतर परत जात असताना भारतीय हद्दीत पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब टाकले असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसल्यानंतर त्यांना हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, परत जात असतानाही पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब फेकले आहेत. या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा अन्य कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचे विमान बडगाम जिल्ह्यात कोसळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर, जम्मू आणि लेह विमानतळावरून नागरी विमान उड्डाणं वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीच्या पार्श्वभूमीवर या तीन विमानतळावरील  वाहतूक तूर्त बंद ठेवण्यात आली असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने तिन्ही दल प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत