पाचवड येथे ट्रेलरला धडकून दुचाकीवरील आनेवाडीचे दोघे ठार

भुईंज :रायगड माझा वृत्त 

पुणे-बंगलोर महामार्गावर पाचवड गावानजीक रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्यामुळे दुचाकीने पाठीमागून ट्रेलरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरूवार, दि. 16 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान सातारच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलरला (एम. एच. 46 एच 5461) पाठीमागून येणार्‍या टीव्हीएस व्हिक्टर या दुचाकीने ( एम. एच. 11 सीएम 0435) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील नीलेश मुरलीधर फरांदे (वय 35) आणि अजित भालचंद्र फरांदे (वय 36), दोघेही रा. आनेवाडी, ता. जावली हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघातानंतर पळून जाणारा ट्रेलर चालक नानासाहेब उत्तम कोडग (वय 26), रा. अवंडी, ता. जत,  जि. सांगली यास भुईंज पोलिसांनी अटक केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य करण्यासाठी शेवाळेवस्ती, पाचवड, उडतरे येथील तरूण व ग्रामस्थ उपस्थित होते. गंभीररीत्या जखमींना त्वरित अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या असत्या तर दोघांचेही प्राण वाचले असते, अशा प्रतिक्रिया मदतकार्य करणार्‍यांनी दिल्या. वारंवार घडणार्‍या गंभीर घटनांमध्ये ही गोष्ट प्रकर्षणाने जाणवली आहे. परंतु त्यावर अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधींनी वा नेत्यांनी दखल घेतली नाही. घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि. बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.
महामार्ग पोलिसांचा चौकशीचा फार्स
रात्रीच्या अंधारात ट्रेलरला पाठीमागील बाजूस टेल लॅम्प, रिप्लेक्टर नव्हते हे महामार्ग पोलिसांना शिरवळ, खंडाळा, जोशीविहीर या ठिकाणी तपासणी करताना दिसलेच नाहीत काय? मग गाडी अडवून नेमकी ते काय चौकशी करतात, असा सवाल उपस्थितीत होत आहे.
आधुनिक रुग्णालयाची मागणी
वारंवार मागणी करूनही महामार्गावर भुईंज नजीक अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय सुरू करा किंवा भुईंजचे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करा, अशी मागणी महामार्गालगतच्या गावातून जोर धरू
लागली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत