पाणी आल्याने ताराबंदर वासियांनाची वणवण बंद

ताराबंदर येथे पाणीपुरवठा सुरळीत; सरपंच नौशाद यांची वचनपूर्ती

बोर्लीमांडला:-अमूलकुमार जैन


 मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे ताराबंदर हे गाव बहुतांश वेळा पाण्यापासून वंचित राहत असल्याने बोर्ली सरपंच यांनी ताराबंदर येथील ग्रामस्थांना गणेशोत्सव काळात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे वचन दिले होते त्या वचनाची वचनपूर्ती पाणी पुरवठा सुरळीतपणे करून दिला आहे.असे प्रतिपादन ताराबंदर येथील बोर्ली मांडला मच्छिमार सोसायटीचे माजी अध्यक्ष मच्छिन्द्र मुरुडकर यांनी पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.यावेळी बोर्ली सरपंच नौशाद दळवी,जिल्हा परिषदेच्या सदस्या राजश्री मिसाळ,अजय सोडेकर,मिलिंद कोपरदर,बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,कौस्तुभ हासपाटील,प्रशांत भोईर,भारत आग्रावकर, संजय नागे,स्वानंद भगत,चेतन भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
       ताराबंदर हे गाव बोर्ली ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत असून हे गाव जवळपास पंचवीस तीस वर्षांपासून वसलेले आहेत. हे गाव उंचावर असल्याने या गावाला नेहमी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असे.ताराबंदर येथील ग्रामस्थांना पाणी आणण्यासाठी बोर्ली येथे जावे लागते. किंवा रिक्षाने पाणी आणावे लागते.त्याचप्रमाणे महिलांना पावसाळ्याचे दिवस सोडले तर कपडे धुण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बामनकुंडी नदीवर जावे लागते.पाणी भरणे आणि कपडे धुण्यासाठी अर्धा दिवस जात असल्याने इतर कामांकडे दुर्लक्ष होत असे.आमच्या साठी पाण्याच्या अनेक योजना आणल्या गेल्या मात्र त्या तकलादू असल्याने पाणी पुरवठा हा व्यस्थित होत नव्हता. त्यामुळे आमची गत अशी झाली होती की, भीक पण मागू नको आणि जगू पण नको,ह्या म्हणीप्रमाणे झाली होती.मात्र सरपंच नौशाद दळवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हा ताराबंदरवासीयांना शब्द दिला होता की गणपति पर्यंत गावातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पुरवठा करीन.त्याप्रमाणे सरपंच नौशाद दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला पाणी पुरवठा करून दिल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना जेवढे धन्यवाद देता येईल तेवढे थोडेच आहे.आम्हाला देण्यात आलेल्या पाण्याचा वापर हा योग्य प्रमाणात करू असेही मच्छिन्द्र मुरुडकर यांनी सांगितले.
सरपंच नौशाद दळवी यांनी सांगितले की ताराबंदर हासुद्धा एक बोर्ली ग्रामपंचायतीचा भाग आहे.ह्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.पाणी मिळावे म्हणून या महिलांनी ग्रामपंचायत मध्ये अनेकदा येवून निवेदन, विनंती सुध्दा केली.मात्र त्यांना पाणी सुरू व्हायचे आणि काही दिवसांनी परत बंद व्हायचे.पाणी ही मूलभूत गरज आहे.त्यांना पाणी मिळावे म्हणून मी सरपंच नात्याने प्रयत्न केले आहे.सरपंच हा गावाचा पालक असल्याने त्याला त्याच्या नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.ते सरपंच म्हणून माझे कर्तव्य आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत