पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पर्जन्याधारित साठवण टाकी

महाड व पोलादपूर तालुक्यातील 22 ठिकाणी पर्जन्याधारित साठवण टाकी

महाड : रायगड माझा वृत्त

ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गावे वाड्यांची पाणीटंचाईच्या काळात होणारी गैरसोय लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाने आता पर्जन्याधारित साठवण टाकी हा टंचाईवर मात करणारा पर्याय शोधला आहे.महाड व पोलादपूर तालुक्यातील 22 ठिकाणी या योजनेचे काम सुरू असुन येत्या काळात आणखी 54 ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली जाईल.

महाड व पोलादपूर तालुके रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुके मानले जातात. आजही अनेक वाड्या दुर्गम भागात असल्याने येथे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई  निर्माण होते. अनेक गावे यामुळे वर्षानुवर्ष टंचाईग्रस्त रहात आहेत. काही वाड्यांना रस्त्यांअभावी टँकरने पाणी पोहचविणे अवघड होते. पाण्याचे स्त्रोत नसलेली ही गावे व वाड्या उन्हाळ्यात पाणी पाणी करत असतात. यावर आता जलस्वराज्य टप्पा 2 हा अभिनव उपाय सापडला आहे. पावसाचे पडणारे पाणी थेट टाकीत साठवून या टंचाईग्रस्त गावांची टंचाईच्या काळात तीन महिने पाण्याची सोय याद्वारे केली जाणार आहे. गावात पर्जन्यधारीत साठवण टाकी बांधून गावाची याकाळात पाण्याची दैनंदिन गरज भागवली जाणार आहे.

 

  • योजना कोणासाठी? 

ज्या गावांना सतत तीन वर्ष टँकरने पाणी दिले जाते. ज्या गावांची 500 लोकसंख्या पेक्षा कमी आहे व दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी प्राधान्याने ही योजना राबवली जाते. लोकसंख्येनुसार ग्रामस्थांना दररोज लागणारे वीस लिटर पाणी तीन महिने पुरेल एवढ्या क्षमतेची टाकी येथे तयार केली जाते. एका मोठ्या टाकीत तीन महिने पुरेल एवढे पाणी पावसाळ्यात साठवले जाते व उन्हाळ्यातील तीन महिेने याचा वापर केला जातो. या मोठ्या टाकीजवळ दररोज लागेल एवढे पाणी साठवले जाईल अशी छोटी टाकी असते . त्यामुळे पाणी वाया जात नाही. पाणी स्वच्छ व निर्जंतुक राहण्यासाठी क्लोरीनेशन यंत्रणाही यात आहे. ही सर्व यंत्रणा तयार स्वरूपात मिळते. झिंक अॅल्युमिनियमची हि टाकी तयार स्वरुपाची असुन जागेवर त्याचे फिटींग केले जाते. गावासाठी  2 ते 10 लाख लिटर्स पाणी राहिल एवढ्या क्षमतेच्या टाक्या तयार केलेल्या आहेत.

  •  साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर  

सध्या महाड तालुक्यातील 8 व पोलादपूर तालुक्यातील 14 ठिकाणी या योजनेची कामे सुरू आहेत. महाडमधील नातोंडी धारेची वाडी, रावतळी गिजेवाडी, वसाप खलाटवाडी , पोलादपूरमधील कोसमवाडी, पळचील धनगरवाडी, वाकण धामणीवाडी, वाकण मुरावाडी, भोगाव पार्टेवाडी, पिंपळवाडी येथील कामे पूर्ण झाली आहेत. दोन्ही तालुक्यासाठी या कामाकरीता साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.यापुढे महाड व पोलादपूरमधील 54 ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. ज्या गावांना पिण्याचे पाण्याचे कोणतेच स्त्रोत टंचाईकाळात उपलब्ध नसतात त्यांना ही योजना वरदान आहे.

सुरूवातीला साठवलेले पाणी कसे प्यायचे असा संभ्रम ग्रामस्थांमध्ये होता. परंतु गाव बैठका घेऊन पाण्याची शुद्धता व त्यातील यंत्रणेबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनीही या योजनेला अनुकुलता दर्शविली आहे.पावसाच्या पाण्यावर आधारित ही योजना आहे.

– ए. ए. तोरो (उपअभियंता, ग्रामिण पाणीपुरवठा विभाग. महाड)

शेयर करा

One thought on “पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पर्जन्याधारित साठवण टाकी

  1. गाव क्षेत्रपाल आमलेवाडी पोस्ट गोळेगानी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड
    ग्राम पंचायत परसुले
    आमच्या क्षेत्रपाल आमलेवाडी वरती हि एप्रिल ते मे मध्ये पाणी टंचाई आहे तर ही योजना आमच्या आमलेवाडी वरतीही राबविण्यात यावी हि विनंती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत