पालकमंत्री बापट यांच्या घोषणा हवेतच, पाणीपुरवठा खंडित

पुणे : रायगड माझा वृत्त `

Image result for girish bapat

पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. पुणेकरांना दोन वेळा पाणीपुरवठा केला जाईल’, ही पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे. पालिकेला ११५० एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. असे असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास आल्याने जलसंपदा विभागाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

पालिका कालवा समितीच्या बैठकीत ठरवून दिल्यापेक्षा अधिक पाणी घेत असल्याने बुधवारी दुपारी चार वाजता जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा बंद केला. अचानक बंद झालेल्या या पाणीपुरवठ्यामुळे पालिकेला केवळ पर्वती जलकेंद्रांतूनच पाणी पुरवठा करता आला. तर लष्कर जलकेंद्राला पाणीच देता आले नाही. परिणामी शहराच्या पूर्व भागाला ऐन नवरात्र सुरु असताना अचानक पाणी कपातीचा सामना करावा लागला आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या खराडी, वडगावशेरी, चंदन नगर तसेच हडपसरच्या काही भागाचा पाणी पुरवठा यामुळे विस्कळीत झाला आहे.याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, जलसंपदा विभागाशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

>जलसंपदा विभागाची मनमानी सुरूच
जलसंपदा खात्याची मुजोरी सुरूच आहे. पालिका अधिक पाणी घेत असल्याचे स्पष्टीकरण देत यापूर्वी देखील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पालिकेला वेठीस धरले होते. काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात जाऊन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केला होता. यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरातील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर पालिकेने थकीत बिल न दिल्याचे कारण पुढे करत पुणेकरांचा पाणीपुरवठा खंडित केला होता. जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र पालिकेत, राज्यात सत्ताधारी असलेले भारतीय जनता पक्षाचे कारभारी त्यांना प्रत्येकवेळी पाठीशी घालत असल्याने त्यांची मुजोरी वाढतच असल्याची चर्चा सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत