पालघरमध्ये भाजपला मोठा धक्का, वनगांच्या कुटुंबीयांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे :रायगड माझा

जेंव्हा पक्षाला २ मतं पडायची तेंव्हापासून वडील काम करत होते. गेली ३५ वर्ष वडिलांनी पक्षासाठी काम केले. पण आज आम्हाला पक्षाने वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी भेट नाकारली’,

 

पालघरचे दिवगंत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. वनगा यांच्या निधनानंतर भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडले असा आरोप त्यांनी पक्ष सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर वनगा कुटुंबीयांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. चिंतामण वनगा यांचा शिवसेनेला आदर आहे.पालघर येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. मात्र पोटनिवडणूक लढवायची की नाही हे नंतर ठरवू असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्री, दानवेंकडे वेळ नाही’

जेंव्हा पक्षाला २ मतं पडायची तेंव्हापासून वडील काम करत होते. गेली ३५ वर्ष वडिलांनी पक्षासाठी काम केले. पण आज आम्हाला पक्षाने वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी भेट नाकारली’, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात येत्या २८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या गोटात उमेदवारी कुणाला द्यायची यावरून जोर-बैठका सुरू असतानाच  वनगा कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पालघर पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचे बहुजन विकास आघाडीने यापूर्वीच जाहीर केले आहे. निवडणूक तोंडावर येऊन ठेपली तरी भाजपचा उमेदवार अजूनही ठरत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.  उमेदवारीसाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

शिवसेनेचाही चार दिवसांत निर्णय

ही पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्यासह जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना सांगितल्या. उद्धव ठाकरे यांनी पुढील चार दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोण होते चिंतामण वनगा?

पालघर जिह्यातील आदिवासींसाठी काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता ते खासदार असा चिंतामण वनगा यांचा प्रवास होता. १९९६, १९९९ तसेच २०१४ मध्ये तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले.  २००९ मध्ये विक्रमगड विधानसभा मतदारसंघात   आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपचे ठाणे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. विरार-डहाणू लोकल सुरू करण्यासाठी  वनगा यांनी आंदोलन केले होते. सर्वसामान्य आदिवासींमध्ये राहून त्यांच्या समस्या थेट लोकसभेत मांडणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत