पालघरमध्ये सापडलं साडेआठ किलो स्फोटकासह १८३ जिलेटीनच्या कांड्या

पालघर : रायगड माझा ऑनलाईन 

विरार जवळील सायवन आणि चांदीप येथून साडेआठ किलो स्फोटके आणि १८३ जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पालघर स्थानिक गुन्हे शाखा आणि विरार पोलिसांनी मिळून वाळू माफियांवर ही कारवाई केली आहे. खाडीतील रेती उपसा करण्यासाठी या स्फोटकांचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विरार पोलिसांनी सोमवारी सायवन येथे छापा टाकून तब्बल १८३ जिलेटीनच्या कांड्या, नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या ३४५ आणि सेफ्टी फ्युजची २१ बंडले जप्त केली आहेत. या प्रकरणी बंगल्याच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. विरार पोलिसांनी ट्रकचालक, मालक आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले आहेत.

वसई तालुक्यात वाळू माफिया सेक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करतात. रविवारी रात्री पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान वाळू माफिया पळून गेले. मात्र, चांदीप येथील एका घरात स्फोटके लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी या घरावर छापा टाकून २४ जिलेटीनच्या कांड्या आणि साडेआठ किलो स्फोटके जप्त केली आहेत.

वाळू माफियांनी आता खाडीतील वाळू काढण्यासाठी स्फोटकांचा वापर सुरू केला आहे. या स्फोटकांच्या आधारे खाडीच्या तळाशी स्फोट करून खाली रुतलेली वाळू सैल करून सेक्शन पंपाच्या आधारे वाळूचा उपसा केला जात होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत