पालघर पोटनिवडणुकीत घोळ, यंत्रणा भ्रष्‍ट : उद्धव ठाकरे

 उद्धव ठाकरेंचा फुसका बार … 

मुंबई : रायगड माझा

भाजपला आता मित्रांची गरज उरली नाही. पालघर निवडणुकीत घोळ झाला असून निवडणुक यंत्रणाही भ्रष्‍ट असल्याचे टीकास्‍त्र उद्धव ठाकरेंनी सत्तेतील मित्र भाजपवर सोडले आहे. पालघर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस शिवसेना नेते संजय राऊत, नीलम गोर्‍हे, आदित्य ठाकरे उपस्‍थित होते.

 निवडणूक यंत्रणा भ्रष्‍ट
पालघर पोटनिवडणुकीत घोळ झाला आहे. निवडणूक यंत्रणा भ्रष्‍ट आहे. एका रात्रीत लाखभर मतं वाढलीच कशी. उष्‍णतेमुळं मतदान यंत्रे बंद पडलीच कशी? असा प्रश्‍न उद्धव यांनी केला. तसेच याबाबत शिवसेनेने आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचेही उद्धव यांनी सांगितले. तसेच निवडणुकीत पैसे वाटणाराच विजयी उमेदवारासोबत असल्याच्या प्रकारावरही आक्षेप नोंदवला. निवडणूक आयुक्‍त निवडणुकीद्वारे निवडला जावा, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले

योगींनी शिवरायांचा अपमान केला

योगींनी महाराष्‍ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा अपमान केला. यावर भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे भाजपच्या शिवभक्‍तीवर संशय आहे. योगींना कैरानामधील जनतेने जागा दाखविली, असे टीकास्‍त्र उद्धव यांनी सोडले.

मोठी घोषणा नाहीच

पालघर पोटनिवडणुकीच्या काळात शिवसेना भाजप युतीत तणाव वाढला होता. त्या पार्श्‍वभूमीवर उद्धव युतीबाबत आजच्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता व्‍यक्‍त होत होती. परंतु, उद्धव यांनी युतीबाबत बोलणे टाळले. त्यामुळे उद्धव युती तोडणार असल्याच्या चर्चा केवळ वावड्याच ठरल्या.

वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी लढलो

भाजपने वनगा परिवाराकडे दुर्लक्ष केले. त्यांना न्याय देण्यासाठी आपण वनगा परिवाराच्या पाठीशी उभे राहिलो. पालघरवासीयजनता शिवसेनेच्या पाठिमागे उभी राहिल्याबद्दल उद्धव यांनी जनतेला धन्यवाद दिले. तसेच हा पराभव मान्य नसल्याचे उद्धव म्‍हणाले.

चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी खरी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत युती तोडण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. परंतु, असा कोणताही निर्णय उद्धव घेणार नसल्याची भविष्यवाणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतून पत्रकार परिषदेच्या काही वेळ आधीच केली होती. त्यानुसार युतीबाबत उद्धव यांनी कोणतेही भूमिका जाहीर केली नाही. तर भाजप शिवसेना युतीचे खंदे समर्थक पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल त्यांना उद्धव यांनी सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत