पालिकेच्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार दोन आठवड्यांची पितृत्व रजा

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन

पालिकेच्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही आता दोन आठवड्यांची पितृत्व रजा मिळणार आहे. याबाबत शिवसेनेने मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहात बहुमताने मंजुरी मिळाली. यामुळे पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

मुंबईत बहुतांशी विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे स्त्री गर्भवती असताना पती नोकरीवर गेल्यावर तिची काळजी घेण्यासाठी तिच्याजवळ कुणीही नसते. या दिवसांत आपल्या जवळच्या माणसाच्या मानसिक आधाराची गरजही असते. त्यामुळे तिच्या पतीने घरात थांबणे गरजेचे असते. मात्र अपुरा कर्मचारीवर्ग आणि कार्यालयीन जबाबदाऱ्यांमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अशी दोन आठवड्यांची पितृत्व रजा घेता येत नाही. मातृत्व रजा लाभ अधिनियम लागू असलेल्या खासगी, पालिका आणि शासकीय आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना 24 आठवड्यांची प्रसूती रजा मिळते, मात्र तिच्या काळजीसाठी पतीला अशी रजा दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी पालिकेच्या महासभेत ठरावाची सूचना मांडून पुरुषांनाही दोन आठवड्यांची पितृत्व रजा द्यावी अशी मागणी केली. ही ठरावाची सूचना महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आली. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्राच्या धर्तीवर निर्णय
केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱया पुरुष कर्मचाऱयांना त्यांच्या सेवा नियमावलीनुसार त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी दोन आठवड्यांची रजा दिली जाते. केंद्र सरकारच्या धर्तीवर पालिकेच्या पुरुष कर्मचाऱ्यांनाही दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची मागणी समाधान सरवणकर यांनी केली. यामुळे संबंधित पुरुषाला पत्नी व बाळाची काळजी घेणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत