पावसाळा संपताच रस्त्यावर खड्डे, नगरसेवकांनी प्रशासनाला दिला घरचा आहेर

मुंबई  : रायगड  माझा वृत्त 

पावसाळा संपताच अनेक भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी नव्याने बांधलेल्या रस्त्यांवरच अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे बुधवारी नगरसेवकांनीच पालिका प्रशासनाला धारेवर धरले. रस्त्यांची दुरवस्था झाली असून याला प्रशासन व कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप करत नगरसेवकांनीच प्रशासनाला घरचा आहेर दिला.

दहिसर पूर्व येथील एस. एन. दुबे रोडवरील रस्ते पावसाळ्यापूर्वी बांधण्यात आले होते, परंतु पावसाळा जातो तोच रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असून याला प्रशासन व कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप सुजाता पाटेकर यांनी स्थायी समितीमध्ये केला. पाटेकर यांच्या या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा देत आपल्या विभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाढाच वाचला. एच पूर्व विभागातील 11 रस्ते पावसाळ्यापूर्वी बांधण्यात आले होते, मात्र पावसाळा जाताच रस्ताच वाहून गेला. संपूर्ण रस्त्यांची चाळण झाल्याचा आरोप सदानंद परब यांनी केला. पावसाळा जाताच रस्त्यात खड्डे कसे पडतात याची चौकशी करावी, अशी मागणी परब यांनी केली.

संत रोहिदास मार्गावर रस्ते बांधण्यात आले होते, परंतु रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. विशेष म्हणजे प्रकाश इंजिनीयरिंग कंपनीने दुसऱ्या नावाने निविदा भरल्या आहेत. प्रशासन एकाच कंत्राटदारावर मेहरबान का आहे, असा सवाल स्थायी समिती सदस्य संजय घाडी यांनी केला.

प्रतीक्षानगरची रस्त्याची प्रतीक्षा कधी संपणार ?
शीव-प्रतीक्षानगर येथील रस्ता गेल्या अडीच वर्षांपासून दुरावस्थेत असल्याची बाब नगरसेवक मंगेश सातमकर यांनी यावेळी मांडली. या रस्त्याचे काम करताना पर्जन्य जलवाहिन्यांची, मलनिस्सारण वाहिन्यांची कामेच केलेली नसल्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रतीक्षानगर येथील रस्त्यांसाठी 37 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, परंतु रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात प्रतीक्षानगरमधील रस्त्यांची अवस्था बिकटच असते. मुंबईतील सगळ्या रस्त्यांपैकी प्रतीक्षानगरमधील रस्त्यांची दुरवस्था आहे. पावसाळ्यात तर प्रतीक्षानगरमध्ये रस्त्यांवर पाणी असतेच, आता उन्हाळा सुरू असतानाही एक फूट पाणी जमा होते. त्यामुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलून या विभागातील मलनिस्सारणाच्या तक्रारी सोडवण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत