पुढील निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे मित्रपक्षांसह मिशन 274 प्लस

नवी दिल्ली : रायगड माझा

एकीकडे भाजपने अनेक वर्षे केंद्रातील सत्तेत राहण्याचा संकल्प सोडला आहे; तर दुसरीकडे कॉंग्रेसने मोदी सरकारला सत्तेवरून हटवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी कॉंग्रेसने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांसह मिशन 274 प्लस हाती घेण्याचे सूचित केले आहे.

कॉंग्रेस कार्यकारिणीची रविवारी बैठक झाली. त्या बैठकीत कॉंग्रेसने लोकसभेच्या 150 जागा मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, त्या वृत्ताचे कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी खंडन केले. मोदी सरकारला सत्तेवरून दूर करणे हे कॉंग्रेसचे मुख्य लक्ष्य आहे. लोकसभेच्या 150 जागा मिळवणे हे आमचे उद्दिष्ट नाही. तर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन 274 पेक्षा अधिक जागा मिळवणे हे आमचे मिशन आहे, असे शर्मा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा 272 हा आकडा पार करणे म्हणजे लोकसभेच्या तितक्‍या जागा जिंकणे आवश्‍यक असते. दरम्यान, कॉंग्रेसच्या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांनी कॉंग्रेसने समोर ठेवायच्या उद्दिष्टाबाबत सादरीकरण केले. कॉंग्रेसचे लोकसभेतील सध्याचे संख्याबळ 48 इतके आहे. ते सहजपणे तिप्पट होऊ शकते. इतर पक्षांना बरोबर घेऊन विविध राज्यांत आघाड्या केल्यास एकत्रितपणे 300 पर्यंत संख्याबळ गाठले जाऊ शकते, असा विश्‍वास चिदंबरम यांनी व्यक्त केल्याची माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत