पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न

शिर्डी : रायगड माझा ऑनलाईन 

नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे ‘देता की जाता’ असा सरकारला इशारा देत सुरू असलेले शेतकऱ्यांच्या लेकींचे आंदोलन सरकारकडून दडपले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. गेल्या पाच दिवसांपासून या शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळाचा मंडप खडून टाकत आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनासाठी बसलेल्या निकीता जाधव आणि पूनम जाधव यांना महिला पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात दाखल केले. तसेच उपोषणकर्त्या मुलींच्या वडीलांना पोलिसांनी अटक केल्यांने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी राहाता पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी पुणतांब्यात शेकऱ्याचे लेकींचे आंदोलन सूरू होते. मात्र मागण्याची पुर्तता न करता सरकारकडून आंदोलन दडपले जात असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. मुलींचा विरोध असतानाही पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले. तसेच काही ग्रामस्थ व शेतकऱ्यांना देखील ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनासाठी उभारलेला मंडप देखील उखडून टाकला आहे. आमच्या जीवाचे काही बरेवाईट झालं तर याला सरकार जबाबदार असल्याचा इशारा या मुलींनी दिला आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी राहता पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. पोलीस जोपर्यंत निरपराध शेतकऱ्यांना सोडत नाही, तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लोखंडे यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत