पुणे : जुना बाजारातून सव्वा दोनशे कोयते जप्त, 5 जणांवर गुन्हे दाखल

पुणे : रायगड माझा वृत्त

कोयत्याने सपासप वार करून मारामाऱ्या, खुन होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर फरासखाना पोलिसांनी जुना बाजारात धडक कारवाई करून पाच विक्रेत्यांडून तब्बल 232 कोयते, सत्तुर जप्त करून आर्म अ‍ॅक्टनुसार त्यांच्यावर कारवाई केली आहे. जयसिंग शामराव पवार (24), निलेश तानाजी साळुंखे (38), दिनेश सुखलाल साळुंखे (40), फक्रुद्दीन जैनुद्दीन लोखंडवाला (42), कासीम नमुद्दीन छावणीवाला (42) यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, महेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सध्या शहर गुन्हेगारांनी डोक्यावर घेतले आहे. रोज चार पाच मारामारी, गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये सर्रास कोयत्यांचा वापर केला जात आहे. सिंहगड, दत्तवाडी, अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातून अवघ्या 200 ते 250 रूपयांमध्ये कोयते विकले जात आहेत. महापालिकेकडून शेती अवजार म्हणून कोयत्यांची विक्री करण्यास परवानगी असली तरी, आर्म अ‍ॅक्टनुसार ठराविक आकारपेक्षा मोठे कोयते विकण्यावर बंदी आहे. हे बंदी असलेले कोयते विकले जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना दहशत निर्माण करण्यासाठी रविवारी आणि बुधवारच्या जुना बाजारात कोयते सहज उपलब्ध होत आहेत.

वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे म्हणाले, आर्म अ‍ॅक्टनुसार ठराविक आकारापेक्षा जास्त आकाराचे कोयते विक्री करता येत नाहीत. मंगळवार पेठेत असे मोठे कोयते विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 232 कोयते जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत