पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने वाचणार

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होऊ शकेल, अशा खालापूर- कुसगाव बोगदा तयार करण्याच्या राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावाला राज्य सरकारने आज (ता. ३०) मंजुरी दिली. सुमारे १३ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पावसाळ्याच्या अखेरीस सुरू होणार आहे.

पायाभूत सुविधांच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. याचवेळी वर्सोवा- बांद्रा सी-लिंक आणि ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या उभारणीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाला खोपोलीपासून, तर पुण्याकडून सोमाटणे फाटा येथून सुरवात होते. बोगदा तयार झाल्यावर वाहनचालकांना खंडाळा घाटाचा वापर करण्याची गरज राहणार नाही. जुन्या पुणे- मुंबई महामार्गाचा सुमारे दहा किलोमीटरचा भाग द्रुतगती मार्गात सध्या समाविष्ट आहे, त्यामुळे तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या प्रकल्पामुळे जुना महामार्ग द्रुतगती मार्गापासून वेगळा होणार आहे. या प्रकल्पांतर्गतच तीन किलोमीटरचा ‘केबल पूल’ उभारण्यात येणार आहे. दरम्यान, वाशीच्या खाडीवर होणाऱ्या सहापदरी पुलामुळे मुंबईत प्रवेश करतानाची कोंडी टळणार आहे. हा पूल ‘एल अँड टी’ कंपनी उभारणार असून, त्यासाठी सुमारे ५६० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे सायन- पनवेल मार्गावरील कोंडीही दूर होणार आहे.

उपसमितीने मंजुरी दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम आता कमी दरात निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराकडे सोपविता येईल. पावसाळ्याच्या अखेरीस काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या निधीसाठी ‘एमएसआरडीसी’ स्पेशल पर्पज व्हेइकल उभारणार आहे.

– राधेश्‍याम मोपलवार, कार्यकारी संचालक, एमएसआरडीसी

प्रकल्पाची किंमत  – ४,९९४ कोटी
बोगद्याचे अंतर   – १३ किलोमीटर

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत