पुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : रायगड माझा वृत्त 

फैजाबादचे अयोध्या झाले, अलाहबादचे प्रयागराज झाले त्याच धरतीवर पुण्याचे नावही जिजापूर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे असं ब्रिगेडच्या नेत्यांचं म्हणणं आहे. १७व्या शतकात पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. पुणे शहर पूर्णपणे बेचिराख झालं होतं. तेव्हा छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री जिजामाता यांनी या पुण्याला नवसंजीवनी दिली. राखेतून शहर उभारलं. या कारणामुळेच पुणे शहराचं नाव जिजामातांच्या नावावर असावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संतोष शिंदे यांनी केली आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेत आले आता त्यांचा मान राखून पुण्याचेही नाव जिजापूर करावे’ असं संतोष शिंदे यांचं म्हणणं आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव करावे तर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड अनेक वर्षं करते आहे. या दोन शहरांची नाव बदलण्याचा प्रस्तावही राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. नुकतंच उत्तर भारतातील अनेक शहरांचं आणि जिल्ह्यांचं नाव बदलण्यात आलं. त्यामुळे पुण्याचं नाव बदलण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी संतोष शिंदे यांनी राज्य सरकारला निवेदनही दिलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत