पुण्याचे माजी महापौर वसंत थोरात यांचं निधन

पुणे : रायगड माझा वृत्त 

‘एक रुपयात झुणका भाकर’ या संकल्पनेचे जनक, पुण्याचे माजी महापौर वसंत विठोबा थोरात यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.


पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई मंडळाचे सर्वेसर्वा असलेल्या थोरातांनी एकदा कसबा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूकही जिंकली होती. पुण्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वाचे स्थान होते. थोरात यांनी पुणे महापालिकेचे नगरसेवकपद तसंच, महापौरपदही भूषविलं होतं. त्यांच्या महापौरपदाच्या काळात महापालिकेच्या वतीनं राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. पुढं अनेक महापालिकांनी त्याचं अनुकरण केलं.

काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या थोरात यांनी आणिबाणी नंतर लोकसभा निवडणूकही लढविली होती. १९९४नंतर त्यांनी राजकीय जीवनातून स्वेच्छेनं निवृत्ती पत्करली होती. अखिल भारतीय मराठा शिक्षण संस्थेमध्येही त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत