पुण्यातून लोकसभेसाठी माधुरी दीक्षितला उमेदवारी?

पुणे : रायगड माझा वृत्त 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यातून खासदारकीच्या उमेदवार म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे पक्ष दीक्षित यांच्या उमेदवारीचा विचार करणार नाही, असे मत भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. इच्छुकांच्या उमेदवारीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पक्षात किमान तीन-ते चारजण इच्छुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा दिल्लीतून सुरू झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई भेटीत दीक्षित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. हा संदर्भ असल्याने दीक्षितांच्या नावाच्या चर्चेला विशेष महत्व आहे.

दीक्षित यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षातील इच्छुकांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली; मात्र खासदार काकडे वगळता प्रतिक्रिया मात्र कुणी व्यक्त केली नाही. या संदर्भात बोलताना खासदार काकडे म्हणाले, “पुण्यात पक्षाची स्थिती भक्कम आहे, त्यामुळे कोणताही उमेदवार निश्‍चितपणे निवडून येईल. कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार खासदार होणार अशी स्थिती आहे. अशावेळी केवळ दीक्षित आहेत, म्हणून पक्ष त्यांना पुण्यातून उमेदवारी देईल असे वाटत नाही.’

पुण्यातील इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे. त्यामुळे दीक्षित यांच्या उमेदवारीच्या चर्चेने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत