पुण्यात आंदोलनाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यलयाची तोडफोड

पुणे : रायगड माझा वृत्त 

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसंच आंदोलकांनी भिंतीवर चढून घोषणाबाजी दिल्या. भिंतीवरील दिवेही फोडले. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसंच आंदोलकांनी पत्रकारांच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला.

दुपारी एक-सव्वा एकच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात निघाले. मात्र आंदोलनातील एका गटाची मागणी होती की जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे. आयोजकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि त्यानंतर खाली तोडफोड सुरु झाली.

“जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी यास नकार दिल्याने तोडफोड केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता.मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. “निवदेन स्वीकारल्यानंतर आंदोलक हिंसक झाले आणि त्यानंतर तोडफोड केली,” असं स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.

जिल्हाधिकारी म्हणाले की, “निवेदन कसं देणार याबाबत आधीच चर्चा झाली होती. त्यानुसार रितसर निवेदन स्वीकारलं. ऑफिसमध्ये 30 ते 40 जण आले आणि निवेदन दिलं. मी हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन असंही आंदोलकांना सांगितलं. यावेळी सर्व परिस्थिती सुरळीत होती. पण त्यामधील काही जणांनी क्षणातच तोडफोडीला सुरुवात केली.””खाली येऊन निवेदन घ्या, अशी मागणी कोणीही केली नव्हती. मी त्यांच्या सतत संपर्कात होतं. मी निवेदन स्वीकारलं नाही, हे चुकीचं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,” असंही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितलं.

आंदोलकांचा एक गट अजूनही कार्यालयाबाहेरच्या भिंतीवर चढून आहे. मराठा समन्वयकांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. पुण्याचे सहआयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत