पुण्यात मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

रायगड माझा वृत्त

विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन आलेल्या मूकबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जमध्ये काही मूकबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे. विद्यार्थी बेफाम झाले होते, त्यांना आवरण्याचा प्रयत्न केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या मूकबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत. अजूनही आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला नसून सौम्य बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते. आंदोलकातील एकाने इतरांना इशारा करून पोलिसांवर चालून जाण्यास सांगितले. अचानक दीड ते दोन हजार आंदोलक पुढे आले. त्यामुळे थोडे तणावाचे वातावरण बनले. त्यानंतर लाठीचार्ज करावा लागल्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले.

आंदोलक मूकबधीर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सरकारने त्वरीत पावले उचलली नाहीत तर मुंबईला चालत जाऊन मोर्चा काढण्याचे आंदोलकांनी ठरवले आहे. मूकबधिरांना शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत