पुराच्या पाण्यात अडकलेल्या 10 शेतक-यांची केली सुखरूप सुटका

महेश सानप यांच्या धाडसाचे सर्वत्र होत आहे कौतूक

कोलाड : कल्पेश पवार

शेतावर भात लावणी साठी गेलेल्या व पूराच्या पाण्यात रात्रभर अडकून पडलेल्या 10 शेतक-यांना सुखरूप बाहेर काढून महेश सानप आणि त्यांच्या टिमने मोठ्या धैर्याने वाचविले आहेत.

 


गेल्या आठवडाभरापासून सगळीकडे जोरदार पर्जन्य वृष्टी होत असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.त्यातच दोन तीन दिवस तर आभाळ फाटल्यागत पाऊस पडत आहे.त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यातच सर्वत्र पावसाळी भात लागवडीची कामे सर्वत्र जोरदार सुरू असल्याने रोहे तालुक्यातील बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी यशवंत बापू थिटे आपल्या घरातील सदस्यांना व अन्य शेतमजूरांना घेऊन शेतावर भात लागवडीसाठी गेले होते.

गावापासून शेत जमिनीचे अंतर फार असल्याने व सायंकाळी पाऊस ओसरल्याने त्यांच्या शेतावर असलेल्या गुरांच्या गोठ्यात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.रात्री शेतावरच जेवणं झाल्यावर पुन्हा पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला. तर पहाटे त्यांच्या शेतजमिनीचे सभोवताली पाणीच पाणी झाल्याने त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.प्रसंग बाका असतानाच त्यांच्या सोबत असणाऱ्या ज्ञानेश्वर थिटे या मुलाने याबाबतची खबर आपल्या इतर भावडांना दिली असता यशवंत थिटे यांची इतर मुले सुनील थिटे,रविंद्र थिटे, महेंद्र थिटे व गावातील अन्य ग्रामस्थांनी त्वरीत त्याठिकाणी धाव घेतली.व समोरचा बाका प्रसंग ओळखून नेहमीच प्रसंगाला धाऊन येणारे संभे येथील महेश सानप यांच्याशी संपर्क साधला असता सानप यांनाही जास्त वेळ न दवडता त्वरीत आपल्या टिमसह हजर राहून मोठ्या धैर्याने आपल्या बोटींगच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या 10 शेतक-यांना सुरक्षित जागेवर आणून सोडले.
जोरदार पाऊस त्यातच नदीचे वाढते पाणी या कशाचीही पर्वा न करता महेश सानप आणि त्यांच्या टिमने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत