पुरातन बौद्धकालीन लेणी होणार नष्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, संवर्धनासाठी संग्रहालय उभारण्याची मागणी

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या हालचालींना सरकारने गती दिली आहे. सिडकोमार्फत विमानतळासाठी येथील १० गावे पूर्णपणे स्थलांतरित होणार आहेत. मात्र, परिसरातील वाघिवली वाडा या ठिकाणी असलेल्या पुरातन बौद्धकालीन लेण्या विमानतळ उभारणीत नष्ट होणार आहेत. त्यामुळे स्थानिकांनी लेणीच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. एकीकडे पुरातन वास्तू जतन करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत, तर दुसरीकडे शेकडो वर्षांचा वारसा लाभलेली लेणी नष्ट करण्यात येत असल्याने या बौद्धकालीन लेण्यांचे पुनर्वसन करून संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी स्थानिक तरुणांकडून करण्यात येत आहे.
पनवेल परिसरात पूर्वीपासून सागरी वाहतूक होत असे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारा त्याची साक्ष देतो. घारापुरी लेण्यांप्रमाणेच पनवेलमधील वाघिवली वाडा परिसरातील ही पुरातन लेणी आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी केरूमातेची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक कराडी समाजाचे दामोदर मुंडकर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनाच्या नुसार, या ठिकाणी लेणी असल्याचे जिल्हाधिकारी ठाणे यांना ७ जून २०१३ रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
नवी मुंबई विमानतळ बांधणी पूर्वीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी करण्यात येणाºया स्फोटांमुळे लेण्यांना धोका निर्माण होत आहे. या ठिकाणच्या डोंगररांगात अनेक कोरीव लेण्या आहेत. वाघिवली वाडा परिसरातील केरूमाता लेणी, कुंडेवहाळ येथील कुलूआई मंदिराची लेणी, ओवळा येथील पाणेरीआई लेणी व दापोलीतील राणूआई या लेण्यांचा यात समावेश आहे. मात्र, विमानतळाच्या उभारणीसाठी येथील केरूमाता या ठिकाणची लेणी पूर्णपणे नष्ट केली जाणार आहेत.
नवरात्रोत्सवात वाघिवली वाडा येथील बौद्धकालीन लेण्यांमध्ये यात्रा भरत असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी भेट देतात. या ठिकाणच्या लेण्या पूर्णपणे नष्ट न करता, तंत्रज्ञानाचा वापर करून या बौद्धकालीन लेण्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, याकरिता सिडकोने २५ एकरमध्ये या लेण्यांचे पुनर्वसन करून त्याकरिता ५०० कोटींची तरतूद केली पाहिजे, अशी मागणी शिवक्रांती मावळा प्रकल्पग्रस्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष किरण केणी यांनी केली आहे. डोंगर सपाट करण्यासाठी सिडकोकडून निविदा मागविण्यात येत असल्या तरी जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी सिडकोने पावले उचलली पाहिजेत.
वाघिवली वाडा येथील बौद्धकालीन लेण्या पाहण्यासाठी श्रीलंका तसेच इतर देशांतील पर्यटक नेहमीच येत असल्याचे गड-किल्ले व पुरातन वास्तूंचे अभ्यासक असलेले चेतन डाऊर यांनी सांगितले. लेण्यांमध्ये कोरीव काम करून बौद्ध भिक्षूंसाठी ध्यानस्थ होण्यासाठी स्थान तयार करण्यात आले आहे. जवळ जवळ ६ ते ७ फूट उंचीच्या या गुफेमध्ये दोन ठिकाणी शून्य आगार पाडले आहे. लेण्यांमध्ये उभारण्यात आलेले खांब (मिनार) हळूहळू नष्ट होत आहेत. जागतिक वारसा जपण्यासाठी शासनाकडून पुरातन वास्तूंच्या जतनासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या लेण्या इतिहासाच्या साक्षीदार असून, लेण्यांवर संशोधन केल्यास पुरातन काळातील कधीही न उलघडलेला खजिना उघड होऊ शकतो, असेही डाऊर यांनी सांगितले.

पर्वत रांगांमध्ये चार बौद्धकालीन लेण्या
वाघिवली वाडा परिसरातील केरु माता लेणी, कुंडेवहाळ येथील कुलूआई मंदिराची लेणी, ओवळा गावाजवळील पाणेरी लेणी व दापोली येथील राणूआई या चार ठिकाणी लेण्या आपले डोंगररांगांमध्ये अस्तित्त्व टिकवून आहेत. मात्र, विमानतळाच्या उभारणीसाठी केरूमाता लेणी पूर्णपणे नष्ट होणार आहेत. कार्लातील एकविरा मातेच्या मंदिराची जशी कालांतराने उभारणी केली. त्याच प्रकारे या लेण्याचेही पुनर्वसन करून त्यासाठी केरूमातेचे मंदिर उभारण्याची मागणी होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत