पुस्तकांचे गाव’ भिलारमध्ये आज वर्षपूर्ती सोहळा….

ऍम्फी थिएटर उद्‌घाटनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

पांचगणी :रायगड माझा

महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून ओळख असलेल्या परंतु आता “पुस्तकांचे गाव’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या भिलारमधील अभिनव प्रकल्पास शुक्रवार, 4 मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या 5 दालनांचे (पुस्तक घरांचे) उद्‌घाटन, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनेक मान्यवर साहित्यिक, कलाकार यांची प्रकल्पास भेट असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर सुमारे 200-250 रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (ऍम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायं. 5 वा. शब्दचांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम योजण्यात आला असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी दर्जेदार कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक-साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्यसाधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तकं, कादंबरी (दालन 2) व चरित्रे-आत्मचरित्रे (दालन 2) या नव्या 5 दालनांचा (पुस्तक घरांचा) शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्वास कुरुंदकर, किशोर पाठक, विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत, अशीही माहिती विनोद तावडे यांनी दिली.
हजारो पर्यटक-वाचकांच्या पसंतीस उतरलेले भारतातील पहिले पुस्तकांचे गाव, निसर्गरम्य खुल्या प्रेक्षागृहात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक गप्पा आणि पुस्तकांचे सान्निध्य यांचा आनंद घेण्यासाठी वर्षपूर्ती सोहळ्याचे निमित्त साधून 4 मे, 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील वाचनप्रेमींनी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) अवश्‍य भेट द्यावी, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत