‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राचे पदार्पण, ठरला जगातील ७ वा सर्वात लहान खेळाडू

रायगड माझा ऑनलाईन ।

19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉला गुरुवारी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी केलेल्या या घोषणेनंतर कसोटी खेळणारा पृथ्वी हा भारताचा 293 वा खेळाडू ठरला आहे. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीच्या 10 अशा गोष्टी सांगणार आहोत ज्याची तुम्हाला माहिती नाहीये.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून 18 वर्षाच्या पृथ्वी शॉ या स्टार फलंदाजाने पदार्पण केले. 1989मध्ये सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर इतक्या लहान वयात कसोटीत पदार्पण करणारा पृथ्वी पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.  कसोटीत पदार्पण करताना पृथ्वीचे वय 18 वर्ष 329 दिवस आहे. तर 21 शतकात भारताकडून इतक्या लहान वयात कसोटीत पदार्पण करणारा तो पहिला खेळाडू आहे.

इंग्लंड दौऱ्यातवेळी पृथ्वीला नेण्यात आले होते. पण त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. आज पृथ्वीने कसोटीत पदार्पण केले. पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पृथ्वीवरील दबाव कमी करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने चक्क त्याच्याशी मराठीमधून संवाद साधला. सामना सुरु होण्याच्या काही तास आधी विराटने पृथ्वीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असे केले.

पृथ्वीला कसा वाटला विराट

मैदानावर विराट शिस्त आणि कठोर असतो. पण मैदानाबाहेर मात्र विराटचे व्यक्तिमत्व वेगळ असल्याचे पृथ्वीने सांगितले. विराटने माझ्याशी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला आणि तो संवाद फारच मजेशीर होता. आमच्यात बराच वेळ हस्यविनोद झाल्याचे पृथ्वी म्हणाला.

ड्रेसिंग रुममधील वातावरण मोकळे आहे. मला पाहिल्यानंतर सर्वजण आनंदी झाले. पहिल्या सराव सत्रात विराटने मला मार्गदर्शन केले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाचा आनंद घेण्यास सांगितले. तु जसा रणजी सामन्यात खेळतोस तसाच येथे देखील खेळ, असे शास्त्रींनी सांगिल्याचे पृथ्वी म्हणाला.

अशी आहे पृथ्वीची कामगिरी

भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवलेली परिपक्वता होय. प्रथम श्रेणीत पृथ्वीने 14 सामन्यात 56.72च्या सरासरीने एक हजार 418 धावा केल्या आहेत. यात 7 शतके  आणि 5 अर्धशतकांचा सामावेश आहे. 188 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच बरोबर 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. 2017मध्ये दुलीप करंडक स्पर्धेत शतक करणारा तो सर्वात लहान वयाचा फलंदाज आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यात पृथ्वीने तीन शतके झळकावली होती.

पृथ्वीने केवळ वयाच्या 14व्या वर्षी हॅरिस शील्ड ट्रॉफी स्पर्धेत 546 धावा करुन विश्वविक्रम केला होता. तर 17व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करत मुंबईकडून शतकी खेळी केली होती.  दुलीप करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने शतकानेच सुरुवात केली होती.

पृथ्वीच्या खेळीमुळेच त्याला भारताचा दुसरा सचिन तेंडुलकर म्हणून पाहिले जात आहे. भारताने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात सोडलेले पृथ्वी नावाच्या या क्षेपणास्त्राच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे हे मात्र निश्चित.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत