पोलिसाला पोलिस ठाण्यातच मारहाण, दीड महिन्यानंतरही कारवाईस टाळाटाळ

दौंड : रायगड माझा

 दौंड शहरातील अवैध व्यवसायांवर कारवाई केल्याच्या रागापोटी पोलिस ठाण्यात एका पोलिस  कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्यासह एकूण पाच जणांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने  केली आहे. पोलिस प्रशासनाने दीड महिन्यानंतरही अजूनही या प्रकरणी कारवाई केलेली नाही.
 दौंड पोलिस ठाण्याचे नाईक संदेश सूर्यवंशी यांचा २४ मार्च २०१८ रोजी रात्री पोलिस ठाण्यात काही राजकीय कार्यकर्त्यांशी वाद झाला . यानंतर या कार्यकर्त्यांनी श्री. सूर्यवंशी यांना दोन वेळा कानाखाली मारहाण केली होती. मारहाणीनंतर संदेश सूर्यवंशी यांनी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करावयाचे सांगितले असता श्री. निंबाळकर यांनी त्वरीत गुन्हा दाखल केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत २६ एप्रिल रोजी सदर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत श्री. सूर्यवंशी यांची बोळवण केली. दरम्यान संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याएेवजी पोलिस निरीक्षकांनी श्री. सूर्यवंशी यांचा कसुरी अहवाल पाठविला, असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदर मारहाणीनंतर २६ मार्च रोजी वरिष्ठांच्या आदेशाने दौंड शहरात तीन ठिकाणी धाडी टाकून मटका प्रकरणी प्रशांत आबाजी भालेराव व इतर आठ जणांना अटक करण्यात आली होती.
पुणे ग्रामीणचे पोलिस दलाचे अधीक्षक यांना भेटून सर्व प्रकार सांगण्यासह झालेल्या प्रकाराचे चित्रीकरण दाखविण्यात आल्याचा दावा श्री. सूर्यवंशी यांनी केला आहे. सदर मारहाण प्रकरणी चार जणांसह या आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करीत त्या मागणीस प्रथम खबर अहवाल (एफआयआर) समजून कारवाई करण्याची मागणी श्री. सूर्यवंशी यांनी २६ एप्रिल रोजी पोलिस महासंचालक यांच्यासह संबंधितांकडे केली आहे. त्याचबरोबर या पाच जणांकडून जीवितास धोका असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस ठाण्यातच मारहाण झाल्यामुळे स्वतः ची अकार्यक्षमता चव्हाट्यावर येऊ नये, याकरिता वरिष्ठ अधिकारी देखील या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत