पोशीर तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कांता हाबळे यांची निवड

नेरळ : रायगड माझा वृत्त 

पोशीर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्षपदी पोशीर मधील पत्रकार कांता हाबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पोशीर ग्रामपंचायतीची ऑगस्ट महिन्यातील नियमित ग्रामसभा आदिवासी वाडी चिंचवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.

रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार कांता हाबळे यांचा सत्कार करताना सर्व पत्रकार बांधव

शासन निर्णयानुसार दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी घेण्यात येणारी विशेष ग्रामसभा यावर्षी घेण्यात आली नाही परंतु ऑगस्ट महिन्यातील नियमित ग्रामसभेचे आयोजन दि. 23 ऑगस्ट रोजी चिंचवाडी येथे शांततेत पार पडली. या सभेचे अध्यक्ष म्हणून सरपंच हरिश्चंद्र धर्मा निरगुडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पोशीर ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामसमितीच्या अध्यक्षपदासाठी पत्रकार कांता हाबळे आणि सुनील राणे यांची नावे त्यांच्या संमतीने सुचवण्यात आली होती .परंतु सुनील राणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने कांता हाबळे यांची तंटामुक्ती ग्रामसमितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याचबरोबर या समितीत नव्याने प्रवीण शिंगटे, मनीष राणे ,कृष्णा हाबळे, सुनील राणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

पत्रकार कांता हाबळे हे एक निष्पक्ष व मनमिळावू व्यक्तित्त्व असल्याने ते या पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. सरपंच हरिश्चंद्र निरगुडा ,ग्रामविकास अधिकारी अशोक रौदळ व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी कांता हाबळे यांचे अभिनंदन केले. कांता हाबळे हे पोशीर ग्रामपंचायतीच्या इतिहासातील तंटामुक्ती समितीचे आजपर्यंत चे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत