प्रकाश आंबेडकर महाआघाडीत येण्याची शक्यता कमी, १२ जागांवर ठाम

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

प्रकाश आंबेडकर महाआघाडीत येण्याची शक्यता कमी, १२ जागांवर ठाम

भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लोकसभेच्या १२ जागांची मागणी केली आहे. जर आम्हाला १२ जागा देण्यास काँग्रेस तयार नसेल, तर राज्यातील ४८ जागांवर बहुजन वंचित आघाडी आपले उमेदवार उभे करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत ते सहभागी होण्याची शक्यता कमीच असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांची महाआघाडी करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण पहिल्यापासून प्रकाश आंबेडकर यांनी या महाआघाडीत येण्यास फारशी उत्सुकता दर्शवलेली नाही. त्याचवेळी त्यांनी एआयएमआयएमसोबत बहुजन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच याच आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पण या भेटीतूनही काँग्रेसच्या हातात फारसे काही पडले नव्हते. प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी महाआघाडीत येण्यासाठी १२ जागांची मागणी केली आहे. गेल्या सलग तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ज्या जागांवर पराभूत झाले आहेत. त्या जागा आम्हाला दिल्या तरी चालेल, असे त्यांनी म्हटले आहे. पण १२ जागा देण्यास काँग्रेस तयार नसेल, तर आम्ही महाआघाडीत येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर या स्थितीत ४८ जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत