प्रधानसेवक कसा हवा हे तुम्हीच ठरवा – नरेंद्र मोदी

रायगड माझा वृत्त

देशाला प्रधानसेवक कसा हवा ते तुम्ही ठरवा. रात्र-दिवस मेहनत करणारा, कष्ट करणारा, भावी पिढीचा विचार करुन १८-१८ तास काम करणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा की, देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा. ते तुम्हीच निवडा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. माझ्याविषयी भरपूर अपशब्द बोलले जात आहेत पण चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे.

चोर देशात असो किंवा विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बोलत होते. आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. नऊ तास बसवून माझी चौकशी केली.

२०१४ आधी बँकेकडून कर्ज घेण्याच्या दोन प्रक्रिया होत्या. एक सामान्य प्रक्रिया होती आणि एक होती काँग्रेस प्रक्रिया. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्ज देण्याची काँग्रेस प्रक्रिया बंद केली असे मोदी म्हणाले.

आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले. आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत. सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे असे मोदींनी सांगितले.

१० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले. काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे असे मोदी म्हणाले.

एका व्यक्तीविरोधात सगळे एकजूट होत आहेत. विरोधकांना देशात मजबूत सरकार नको, मजबूर सरकार हवे आहे. जेणेकरुन त्यांना भ्रष्टाचार करता येईल. देशाला मजबूत सरकार हवे आहे पण विरोधकांना कुटुंब, नातेवाईकांचे भले करण्यासाठी संरक्षण डीलमध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे असा आरोप मोदींनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत