प्रवासात कुणी तुमचा पाठलाग करतंय असं लक्षात आलं तर?..

कारण कुठलंही असो, आपल्याला नियमितपणे बाहेर पडावंच लागतं, प्रवास करावा लागतो. पण कधी कधी अचानक काही प्रॉब्लेम समोर उभे ठाकतात आणि अशावेळी काय करायचं ते आपल्याला सुचेनासं होतं..
त्यामुळेच प्रवासाच्या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. विशेषत: तुम्ही एकटे असताना आणि त्यातही महिला असाल तर जास्तच काळजी घेतली पाहिजे. यात ‘महिला’, ‘पुरुष’ असा भेदभाव करण्याचा हेतु नाही, पण तरीही काही गोष्टींबाबत महिलांना अधिकची काळजी घ्यावीच लागते.

प्रवासाला गेल्यानंतर काय काळजी घ्याल?
१- खरं तर प्रवासाला गेल्यानंतर घ्यावयाच्या काळजीपेक्षा ती काळजी अगोदरच घेतली पाहिजे आणि समजा दुर्दैवानं काही अनवस्था प्रसंग आपल्यावर ओढवला तर काय करायचं, याची मानसिक तयारीही आपण अगोदरच करून ठेवलेली असली, तर ऐनवेळी मग एकदम डगमगायला होत नाही. हाता पाय न गाळता योग्य तो निर्णय आपल्याला घेता येतो.
२- प्रवासाला गेल्यानंतर आपल्या घराचा पूर्ण पत्ता, महत्त्वाचे फोन नंबर्स आपल्याजवळ आणि जिथे आपण राहाणार आहोत, तिथेही असायला हवा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथला पत्ता, फोन नंबर्सही आपल्याकडे हवेतच. तेही डायरीत नाहीतर एखाद्या कागदावर हाताने लिहिलेले. फोनची बॅटरी केव्हाही दगा देऊ शकते.
३- बाहेर तुम्ही एकट्याने कुठे जात असताना, त्यातही ती वेळ रात्रीची असताना तुमचा कुणी पाठलाग करतं आहे, असं लक्षात आल्यावर धावतपळत आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठू नका. त्याऐवजी रस्त्यावरच जर एखादं हॉटेल, घर दिसलं, तर तिथे आधी जा. त्यांना तुमची अडचण सांगा. तिथून मदत मिळू शकते.
४- प्रवासात पैसे, बॅग, पर्स लांबवले जाण्याचें प्रकार खूप वेळा होतात. त्यामुळे सारे पैसे कधीच एकाच ठिकाणी ठेऊ नका. ते विखरून ठेवा. म्हणजे काही खिशात, काही बॅगमध्ये, काही पर्समध्ये.. अशा पद्धतीनं. म्हणजे दुर्दैवानं काही झालंच तर आपण अगदीच कफल्लक होणार नाही..
प्रवासात अशा काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यासंदर्भात आणखी काही माहिती पुढच्या भागात..

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत