प्रशिक्षणार्थींनी तंत्रशुद्धरित्या गिरवले  आगरी व्याकरणाचे धडे

रायगड माझा वृत्त:पाली 

बोली भाषा संवर्धनार्थ ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात चालू असलेल्या आगरी शाळा या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  शनिवारी(ता.१२) व रविवारी (ता.१३) या शाळेचे ६, ७, ८वे सत्र उत्साहात पार पडले. या सत्रांमध्ये प्रशिक्षणार्थींनी तंत्रशुद्धरित्या आगरी व्याकरणाचे धडे गिरविले. दरम्यान, रविवारी(ता.२०) आगरी शालेच्या समारोपावेळी आगरी बोलीतील लघुनाटिका सादर होणार आहे.

अनेक आगरी-बिगर आगरी प्रशिक्षणार्थी आवर्जून आगरी शाळेला हजेरी लावत आहेत. १२ व १३ मे रोजी पार पडलेल्या या सत्रात गजानन पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले. गजानन पाटील यांनी आगरी साहित्यावर बोलतांना काही विनोदी कविता आणि किस्से सांगीतले. त्याचबरोबर बोलीभाषेचा व्यवहारातही वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. मोरेश्वर पाटील यांनी आगरी बोलीत प्रमाण मराठीतले शब्द कसे कमी होत जातात हे सांगितले. व खायला चे खावाला होणे, जेवायला-जेवाला आणि खेळायला चे खेलाला होते अशी उदाहरणे दिली. सर्वेश तरी यांनी ‘आगरी बोली काल-आज-उद्या’ या विषयावर मार्मिक विवेचन केले.

आगरी शाळेचे पुढील सत्र १९ मे ला ४ते ६ वाजता कशेळीतील मराठी शाळेत होणार आहे. यावेळी प्रकाश पाटील, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, दया नाईक मार्गदर्शन करणार आहेत. आगरी शालेची सांगता २० मे रोजी होणार आहे. आगरी बोली प्रचार व प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सर्वांसाठी मोफत सुरु झाला आहे.
school

आगरी शाळेची विविधता
या सत्रा दरम्यान महाराष्ट्रातून वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी रिध्दी म्हात्रे उपस्थित होती. ती प्रमाण भाषेत उत्तम व्याख्याता असून, शहरात राहून, मुंबईत उच्चशिक्षण घेऊनही घरी आपली आगरी बोलते. तिला ‘धवला’ साहित्यप्रकार अवगत असल्याने आगरी शाळेत तिचा सत्कार करण्यात आला. सोबत पेणवरून आलेले साहित्यिक रायगडभुषण म.वा म्हात्रे, जुचंद्रचे प्रसिध्द रांगोळीकार शैलेश पाटीलहेही उपस्थित होते. आगरी शाळेचे प्रशिक्षणार्थींना इतकी गोडी लागली आहे की प्रशिक्षणार्थी रोहन गायकर हे थेट शाळेला आगरी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते.

आगरी बोलीचे व्याकरण
सर्वेश तरे यांनी आगरी बोलीचं व्याकरण समजवताना आगरी एकवचन-अनेकवचन, कालदर्शक-गतीदर्शक-स्थळदर्शक ई.आगरी शब्द, आगरी म्हणी जसं की‘वाकरे कुरघीला वाकरा दर’ म्हणजे माणूस पाहून तसे वागणे, त्या नंतर आगरी वाक्यप्रचार जसं की ‘चिचवशी साश देने’ म्हणजे खोटी साक्ष देणे अश्या प्रकारचे म्हणी, वाक्यप्रचार, तसेच कोड्यांचा उल्लेख केला. त्यांनी आगरी बोलीतील बाराखडी सांगीतली.

त्याच बरोबर आगरी बोलीत ळ,ण,छ,ष,क्ष,ज्ञ,ए,ऐ,ओ या वर्णाक्षरांचा वापर होत नसून, त्या जागी अनुक्रमे ल,न,स-श्य,श-ख,न्य,य,आय,व या वर्णाक्षरांचा शब्दात वापर केला जातो असे म्हटले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत