प्रश्न राज ठाकरेंचा उत्तर शरद पवारांचं, उत्सुकता शिगेला

(रायगड माझा ऑनलाईन टीम)

कला, साहित्य विषयात दोघांचाही व्यासंग दांडगा… दोघेही पक्षाचे नेते असल्याने राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी… एखाद्या मुद्द्यावर ठाकरीशैलीत राज ‘साहेबां’वर टीका करणार… तर तितक्याच अधिकारवाणीने ‘साहेब’ राजला कानपिचक्या देणार….असं काहीसं हे राजकारणातलं दोघांचं नातं…मात्र राजकारण बाजूला सारून दोघेही एकाच व्यासपीठावर येणार आहेत, तेही एका वेगळ्या भूमिकेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, क्रीडा कारकिर्दीचा प्रवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे संवादकाच्या भूमिकेतून उलगडणार आहेत.
साहेबांचे राजकारणातील ‘राज’ वाक्चातुर्याने ठाकरे बाहेर काढण्यात यशस्वी होणार का? आणि ‘साहेब’ तितक्याच दिलखुलासपणे ठाकरीशैलीला मनमुरादपणे प्रतिसाद देणार का? याची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जागतिक मराठी अकादमीतर्फे झालेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी बृहन्महाराष्टÑ वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) येथे होणाºया या बहुप्रतीक्षेतील मुलाखतीकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही मुलाखत म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज ठरणार असल्याने कार्यक्रमाला राज्यभरातून कार्यकर्ते, रसिक, मान्यवर मंडळींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही!
या वेळी शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लीला गांधी, चंदू बोर्डे, नागराज मंजुळे, विलास रकटे, संदीप वासलेकर, डॉ. पी. डी. पाटील, हणमंतराव गायकवाड या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत